नाशिक शहर दत्तक घेतो अशी भीमगर्जना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकसाठी काय केलं? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची क्लिपही दाखवली. नाशिकमध्ये मनसेच्या कामांवर भाजपाने डल्ला मारला असाही टोला राज यांनी लगावला. त्यासाठी त्यांनी काही वृत्तपत्रातल्या बातम्याही दाखवल्या. मुख्यमंत्री किती खोटं बोलतात त्याला काही सुमार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

नाशिकमध्ये मनसेला लोकांनी कौल दिल्यानंतर जी विकासकामं नाशिकमध्ये झाली ती भल्याभल्यांना अद्यापही जमलेली नाहीत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. नाशिकमध्ये काय काय विकासकामं केली याचा एक धावता आढावाच राज ठाकरेंनी सभेत घेतला आणि मतदान करताना कुणाला मतदान करताय याचा विचार करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब या ठिकाणच्या सभेत राज ठाकरेंनी ही टीका केली आहे. नाशिककरांनी आमच्या हातून सत्ता घेतली त्याचं वाईट वाटलं पण जी कामं केली ती केली. मला वाईट वाटलं पण मी खोटी भाषणं केली नाहीत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

१ लाख २० हजार विहिरी बांधल्याचा दावा मुख्यमंत्री कशाच्या जोरावर करत आहेत? त्यांच्या थापा मारण्याला काही सुमार राहिला आहे की नाही? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलीच कामं भाजपने आम्ही केली असं दाखवलं. ह्या बातम्या नाशिकच्या वर्तमानपत्रात आल्या होत्या आता यांना कशाच्या आधारे मतं द्यायची असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.