मनसेचा थेट प्रचारात उतरण्यास नकार; मात्र पत्रकातून युतीवर तोंडसुख

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांचे रान उठवले असले तरी, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मनसेने उघडपणे शिवसेना-भाजपविरोधात भूमिका घेतलेली नाही. येथील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्याशी असलेल्या जुन्या वैरामुळे मनसेने याठिकाणी काँग्रेसचा प्रचार करणेही आतापर्यंत टाळले होते. परंतु, आता एक पत्रक काढून मनसेने शिवसेना-भाजपवर तोंडसुख घेतले आहे. हे पत्रक म्हणजे, एकप्रकारे निरुपम यांना पाठिंबाच असल्याचे बोलले जात आहे.

आपला एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसताना मोदी सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे यांनी ‘अपप्रचारा’चे रान उठविले आहे. अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते काँग्रेस आघाडीसोबत मैदानात उतरून प्रचारही करत आहेत.

मात्र ‘उत्तर पश्चिम’सारख्या मतदारसंघात जिथे युतीचे उमेदवार गजानन कीर्तीकर आणि आघाडीचे उमेदवार संजय निरुपम या दोघांमध्ये लढत आहे तिथे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. कारण इथून निवडणूक लढवणाऱ्या निरुपम आणि मनसे यांच्यात उत्तर भारतीयांच्या प्रश्नावरून कट्टर वैर आहे. पण तिथेही मनसेने पत्रकबाजी करून सत्ताधाऱ्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मतदारांना करण्यास सुरुवात केली आहे.

‘अपप्रचारा’ची पत्रकबाजी

मनसेने मोदी सरकारच्या विरोधात अपप्रचार करणाऱ्या सभांबरोबरच पत्रकेही वाटली आहेत. अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणारी पत्रके वाटत असताना मनसेने वाटलेली ही अपप्रचाराची पत्रके चर्चेचा विषय ठरली आहेत. यात राज यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. नोटाबंदीच्या दुष्परिणामांची जबाबदारी कोणाची, नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले यावर सत्ताधारी कधी बोलणार, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना घरगुती गॅस, पेट्रोलच्या किमती का वाढलेल्या आहेत, गेल्या पाच वर्षांत या सरकारने किती नोकऱ्या दिल्या, असे प्रश्न मतदारांनी युतीच्या उमेदवारांना विचारावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या सत्ताधाऱ्यांना हटवण्यासाठी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

एक लाख २३ हजार मते

या मतदारसंघात मनसेने सन २००९ मध्ये शालिनी ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १ लाख २३ हजार मते मिळाली होती. तर २०१४च्या निवडणुकांमध्ये मनसेने महेश मांजरेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ६६ हजार मते मिळाली होती. मनसेच्या भूमिकेमुळे ही मते कुणाच्या पारडय़ात जातात याबाबत उत्सुकता आहे.

भाजप सरकारने चालवलेल्या हुकूमशाही आणि फसवणुकीविरोधात मतदान करा, असा राज साहेबांचा आदेश आहे. शिवसेनेने मनसेचे नगरसेवक पळवून नेले ते देखील मनसैनिक विसरलेले नाहीत. त्यामुळे राज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते योग्य तो निर्णय मतदानाच्या दिवशी घेतील.

-संदीप देशपांडे, प्रवक्ते, मनसे