भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गुजरातच्या गांधी नगरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज आज अमित शाह यांनी भरला. याआधी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. या सोहळ्यासाठी मुंबईहून उद्धव ठाकरेही गांधी नगर या ठिकाणी रवाना झाले. ज्यानंतर उद्धव ठाकरेंवर सर्व स्तरातून टीका होते आहे. मनसेनेही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अफझल खानाचा फॉर्म भरण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख गुजरातला रवाना झाले अशीच टीका संदीप देशपांडे यांनी त्यांच्या पोस्टमधून केली आहे. उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे.

काय आहे संदीप देशपांडे यांची पोस्ट

आम्ही ‘शहाचे’ सैनिक वेडे, करून जिवाचे रान, चाललो गुजरातला भरायला ‘अफझल खानाचा’ फॉर्म..! अशी ही पोस्ट आहे. आपल्याला ठाऊक आहे की गेल्या पाच वर्षात युतीची अवस्था एकमेकांमधून विस्तव जात नाही अशीच होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर टीका करताना अफझल खानाची फौज अशी उपमा दिली होती. हाच संदर्भ घेऊन मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना आणि भाजपा यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती जाहीर केली आणि सगळ्याच विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र त्या टीकेची पर्वा न करता आम्ही लोकहितासाठी एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आता आज उद्धव ठाकरेंनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे जेव्हा उमेदवारी अर्ज भरत होते तेव्हा गुजरातमध्ये हजेरी लावली. त्यावर आता मनसेने निशाणा साधला आहे.