मोदी महाराष्ट्रात सभेला आले त्यावेळी वर्धा, गोंदिया, नांदेड या तीन सभेत माझ्यावर टीका केली आणि लातुरात चुकीच्या जागी गेले असे वक्तव्य केले. माझ्या कुटुंबावर त्यांनी टीका केली. माझे भाऊ, बहिणी आणि त्यांची मुलं, नातवंडं सगळी आपापल्या ठिकाणी मस्त आहेत. दरवेळी आम्ही कुटुंब एकत्र येतो आणि आहोत. परंतू मोदींच वेगळं आहे, यांचं कुटुंबच नाही. त्यामुळे त्यांना कुटुंबाचा अनुभव कसा मिळणार आणि कळणार असा टोला लगावतानाच मोदींना देशाच्या प्रश्नांची नाही माझ्या कुटुंबाची जास्त काळजी पडलीय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर केली.

लोकांनी पाच वर्ष चुकून संधी दिली कारण तुम्ही काही तरी कराल असं जनतेला वाटलं होतं परंतू आता सर्वांनी तुम्ही दिलेल्या संधीचं काय केलंत हे बघितलं आहे. त्यामुळे लोक पुन्हा संधी देतील असं वाटत नाही. नेहरु, गांधी व माझ्यावर टीका करुन काही होणार नाही हे लक्षात घ्या, असा इशाराही पवारांनी यावेळी नाशिककरांना दिला.

या सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही, त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार नाही, बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी भाजप सरकार देत नाही, त्यामुळे या सरकारचं आता फार झालं. महाआघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ पवार यांची जाहीर सभा सय्यद पिंपरी नाशिक येथे पार पडली. यावेळी शरद पवार यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारवर तोफ डागली. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आस्था राहिलेली नाही असे म्हटले.

मोदी जातील तिकडे मी हे केलं, मी ते केलं सांगत आहेत. सर्जिकल स्ट्राईक जवानांनी केलं परंतु ५६ इंचाची छाती सांगत आहे मी केलं अहो तुम्ही काय केलं. जे केलं ते आपल्या जवानांनी केलं. दुसरीकडे आपला जवान अभिनंदन यालाही सोडवून आणलं सांगत आहेत मग पाकच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधवला का सोडवून आणत नाही. त्यावेळी कुठाय तुमची ५६ इंचाची छाती असा सवालही पवार यांनी केला.