मोदी सरकारने राबविलेली सर्व धोरणे फोल ठरली असून, त्यांच्या हुकूमशाहीमुळे व्यावसायिकांचे लहान-मोठय़ा उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. प्रत्येक गोष्टीत सरकारचा हस्तक्षेप होत असून, हा हस्तक्षेप देशाला अराजकतेकडे नेत आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

नोटाबंदी, जीएसटी ही धोरणे राबवताना मोदी सरकार तोंडावर पडले आहे. मोठय़ा उद्योगांना अवकळा आली आहे. आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेत मोदी सरकारचा हस्तक्षेप आहे. नोटाबंदीत बँकेच्या बाहेर गरिबांच्या रांगा लागल्या. त्या रांगांमध्ये अंबानी दिसले नाहीत, अशा शब्दांत पवार यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

मोदी हिंदुत्वाचा प्रचार करतात. पंतप्रधान कुठल्या एका धर्माचा नसतो. तो सर्व जाती धर्माचा असतो अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रश्न का सुटलेले नाहीत? असा सवाल करीत मोदींना हटवा, सर्व प्रश्न सुटतील, असा दावा पार्थ पवार यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, डॉ. राजेंद्र गवई, आमदार बाळाराम पाटील, चित्रा वाघ, महेंद्र घरत, जे. एम. म्हात्रे, प्रमोद हिंदुराव यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.