लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. सर्व पक्षातील दिग्गज नेते प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यावेळी अनेकदा प्रचारसभेत अशा काही घटना घडतात ज्यामुळे नेत्यांसमोर अडचण निर्माण होते. काँग्रसे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झारखंडमधील प्रचारसभेदरम्यान असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला. राहुल गांधी मंचावर असताना सुरुवातीला ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा सुरु होत्या. पण त्याचवेळी पुढील रांगेत बसलेल्या काही स्थानिक आदिवासी महिलांनी ‘मोदी जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांचं भाषण संपताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंचावरुन ‘चौकीदार चोर है’ घोषणा देण्यास सुरुवात केली. पण यावेळी पत्रकारांच्या मागील रांगेत बसलेल्या महिलांनी ‘मोदी जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. महिलांना मोदी जिंदाबादच्या घोषणा देताना पाहून आयोजकही थोडा वेळ शांत होते. यावेळी नेमकं काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं.

पत्रकारांनी मोदींच्या नावे घोषणाबाजी करणाऱ्या महिलांना कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत. कारण त्यांच्यामुळे आम्हाला शौचालय, गॅस कनेक्शन, घर आणि वीज मिळाली आहे’.

राहुल गांधींच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होण्याची तशी ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा राहुल गांधींच्या समोर मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यात बंगळुरु येथे राहुल गांधीच्या सभेबाहेर ‘मोदी मोदी’ अशी घोषणाबाजी झाली होती. यावेळी घोषणा देणाऱ्यांना जबरदस्ती हटवण्यात आलं होतं. याआधी 28 फेब्रुवारी रोजी कर्नाटकात राहुल गांधीच्या सभेदरम्यान ‘नरेंद्र मोदी की जय’ बोलल्याप्रकरणी दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.