पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेमध्ये शरद पवार आणि कुटुंबियांवर टीका केली होती. त्यावरुन आज पुण्यातल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी आत्मपरिक्षण करावे पवार कुटुंबियांची काळजी करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, विविध मुद्द्यांवरुन यावेळी अजित पवारांनी राज्य सरकारवरही टीका केली. पवार म्हणाले, शेतकरी तरुणांचे अनेक प्रश्न मार्गी लागले नाहीत. ५ वर्षातील आश्वासनांची पु्र्तता अद्याप झालेली नाही. आघाडीच्या काळात लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं गेलं होतं. त्यावेळी मंदीच्या काळात जगातील अनेक राष्ट्रं उध्वस्त झाली पण भारत तग धरुन होता याचे श्रेय तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंगांना होते. आता पुन्हा युपीएचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यात येईल असा काँग्रेसचा जाहिरनामाही यावेळी त्यांनी लोकांसमोर मांडला.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा उमेदवार अर्ज भरण्यात आला.यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार पार्थ पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पक्षात काय चाललंय त्याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवतील, तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. त्याऐवजी तुम्ही समाजाची चिंता केली असती, गरीबांना न्याय देण्याची भुमिका घेतली असती, राफेल विमानाबाबत शंका डोक्यातून काढली असती बरं झालं असत. तुम्ही लोक आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही लावारिस म्हणतात. तुमचे लोक तुम्हाला विष्णूचा अकरावा अवतार म्हणतात, ते हनुमानाची जात काढतात तसेच तुमचे आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषाही करतात, या गोष्टींच जरा आत्मपरिक्षण करा, अशा शब्दांत त्यांनी मोदींना टोला लगावला.

दरम्यान, मोदींच्या या विधानावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटतं देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात आणि मी कधी काळी एका छोट्याश्या गावात केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करतात. मी त्यावेळी केलेले ते वक्तव्य ही माझ्या राजकीय जीवनातील मोठी चूक होती असे मानतो. त्याबाबत मी अनेकदा माफीही मागितली आहे. त्यानंतर अनेक निवडणुकाही झाल्या. मात्र, त्यानंतरही पतंप्रधानांनी तो मुद्दा पुन्हा उकरून काढला.

वर्ध्याच्या सभेत बोलताना मोदींनी शरद पवार आणि कुटुंबियांवर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात, अशा शब्दांत त्यांनी आघाडीवर टीकास्त्र सोडले होते.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्याने धरणात पाण्याची मागणी केली तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहित आहे. मावळमध्ये पवार कुटुंबाने शेतकऱ्यांवर गोळया चालवण्याचे आदेश दिले. स्वत: शेतकरी असून शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या विसरले. शरद पवारांचे लक्ष शेतकऱ्यांवर नव्हते असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.