सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी सकाळी सर्वात आधी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपुरमधील दफ्तारी शाळेत मतदान करण्यासाठी दोघे एकत्र सकाळी पोहोचले होते. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकशाहीसाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. देशाची सुरक्षा, विकास आणि एकात्मतेसाठी केलं पाहिजे. हेच आपला निवडणूक आयोगही सांगतो आणि आम्हीही तेच सांगतोय असं मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं. तर भैय्याजी जोशी यांनी नोटा हा पर्याय नसल्याचं मत व्यक्त केलं.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून तीन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ११ हजारांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत.

मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना व भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी नाकारली असून त्यांच्याऐवजी नाना पंचबुद्धे यांना रिंगणात उतरवले आहे.