मैनपुरी, उत्तर प्रदेश : जवळपास दोन तपांचे शत्रुत्व संपवून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले. मुलायमसिंह यादव हे मागासवर्गीयांचे खरे नेते असून पंतप्रधान मोदी हे मागासवर्गीयांचे बनावट व नकली नेते आहेत, अशी टीका मायावती यांनी केली.

समाजवादी पक्षाचे उमेदवार मुलायमसिंह यांच्या प्रचारासाठी ख्रिश्चन कॉलेज मैदानवर सभा झाली, त्या वेळी समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी मायावती यांचे स्वागत केले. १९९५ मध्ये समाजवादी पक्षाच्या गुंडांनी मायावती यांच्यावर राज्याच्या अतिथिगृहात हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही पक्षातील संबंध तुटले होते.

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी मायावती यांचे स्वागत करून ‘मायावतीजींचा नेहमी आदर करा,’ असे समर्थकांना सांगितले. बऱ्याच काळानंतर आम्ही एका मंचावर आलो असून आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मुलायम म्हणाले.

मायावती यांनी त्यांच्या भाषणात समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले, काही वेळा देश, लोक व पक्ष यांच्या हितासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात, असे मायावती यांनी स्पष्ट केले.

मुलायमसिंह यादव यांनी समाजाच्या सर्व थरांतील लोकांना बरोबर घेऊन काम केले, त्यामुळे ते मागासांचे खरे नेते आहेत. नरेंद्र मोदी हे मागासांचे नकली नेते आहेत, असे मायावती यांनी सांगितले. या वेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही त्यांच्या खास शैलीत भाषण केले. आपण समाजवादी पक्षाच्या सभेत आहोत हे विसरून मायावती सुरुवातीला ‘जय भीम’ म्हणाल्या व नंतर ‘जय लोहिया’ अशी पुस्ती जोडली.

सप-बसप एकत्र येणे हा मोदींना वाढता पाठिंबा असल्याचा पुरावा ; शाहनवाझ हुसेन यांचा दावा 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीवर शुक्रवारी भाजपने हल्ला चढविला. सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढता पाठिंबा मिळत असल्यानेच विरोधी पक्षांच्या नेत्यांना जबरदस्तीने एकत्र यावे लागले असल्याचे भाजपने म्हटले आहे. अनेक वर्षे एकमेकांवर टीका करणारे सपाचे नेते मुलायमसिंह यादव आणि बसपाच्या नेत्या मायावती एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी वरील टीका केली आहे. सदर दोन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर यावे लागले हा मोदी यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचा पुरावा आहे. उत्तर प्रदेश आणि देशातील जनता मोदींबरोबरच आहे, असेही हुसेन  यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.