News Flash

उर्मिलाला हवी ‘मनसे’ची साथ, राज ठाकरेंकडे मागितली मदत

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत मनसेची साथ हवी आहे.

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत मनसेची साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात थेट लढत आहे. उत्तर मुंबईत मोठया संख्येने मराठी मतदार आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

उर्मिला मातोंडकर आणि राज ठाकरे यांची जुनी ओळख आहे. राज ठाकरेंनी सर्व मनसे कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही जाहीरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणार नाही. पण अप्रत्यक्ष मदत करु असे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. राज यांच्या आदेशानंतर मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे शनिवारी शिवाजीपार्कमध्ये काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करताना दिसले.

उत्तर मुंबईतून काँग्रेसने दुसऱ्यांदा एका सेलिब्रिटीला उमेदवारी दिली आहे. २००४ साली काँग्रेसने या मतदारसंघातून अभिनेता गोविंदाला राम नाईक यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती आणि गोविंदा ही निवडणूक जिंकला होता. यंदा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसला येथे तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता. उर्मिलाने या आठवडयात काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेच दोन दिवसात उमेदवारी जाहीर केली.

उर्मिला मराठी असून तिला घरघरात ओळखणारा वर्ग आहे. तिच्या या सेलिब्रिटी स्टेटसचा फायदा होऊ शकतो. २००४ मध्ये गोविंदाप्रमाणे ती गेमचेंजर ठरु शकते असे मुंबई काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे मत असल्याने तिला या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 3:37 pm

Web Title: mumbai north congress candidate urmila matondkar asks raj thackeray for help
Next Stories
1 शिवतारेंच्या ‘त्या’ टीकेला कार्यकर्तेच सडेतोड उत्तर देतील : पार्थ पवार
2 पुण्यात उमेदवार ठरण्याआधीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुरु केला प्रचार
3 वायनाडमध्ये राहुल गांधींना पराभूत करू; डाव्यांची प्रतिज्ञा
Just Now!
X