दिव्यांग व्यक्तींना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुविधा उपलब्ध केल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात असला तरी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होते, हा संशोधनाचा विषय असतो. दिव्यांग व्यक्तींना मतदानाच्या अधिकाराचा वापर करता यावा, यासाठी नागपूरमधील प्रकाश अंधारे हे लढा देत असून त्यांनी या प्रकरणी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

नागपूरमध्ये राहणारे प्रकाश अंधारे हे ७४ वर्षांचे असून ते राजस्थानमधील पिलानी येथील सिरी या संस्थेतून निवृत्त झाले आहेत. प्रकाश अंधारे हे शास्त्रज्ञ आहेत. प्रकाश अंधारे हे दोन्ही पायांनी अपंग असून नागपूर शहरात दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ते गेल्या पाच वर्षांपासून लढा देत आहेत. प्रकाश अंधारे यांचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. यानंतर त्यांनी मुंबई आयआयटीमधून एमटेक पूर्ण केले. निवृत्तीनंंतर नागपूरमध्ये परतल्यावर अंधारे यांना दिव्यांग व्यक्तींना शहरात फिरताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, हे लक्षात आले आणि यासाठीच त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली.

प्रकाश अंधारे यांनी मतदान प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींनाही सहभागी होता यावे, यासाठी लढा सुरु केला आहे. ते सांगतात, निवडणुकीत मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींना सुविधा उपलब्ध करुन देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. निवडणूक आयोगही सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे सांगते. मात्र, प्रत्यक्षात मतदान केंद्रावर सुविधा आहेत का, याची पाहणी करणारी यंत्रणाच नाही.

यासंदर्भात अंधारे यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. मतदान केंद्रांवर जाणाऱ्या व्यक्तींनी दिव्यांग व्यक्तींसाठी रँप, व्हीलचेअर अशा मूलभूत सुविधा आहेत का, याकडे लक्ष द्यावे आणि अशा सुविधा नसल्यास त्याचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर अपलोड करावे, किंवा संबंधित यंत्रणांना पाठवावे, असे आवाहन अंधारे यांनी केले आहे.

मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी कोणत्या सुविधा अपेक्षित ?

> अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर
> दिव्यांग व्यक्तींसाठी मदतनीस
> दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था
> अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी मॅग्निफाइंग ग्लास
> अंध मतदारांसाठी मतदान यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधा