12 July 2020

News Flash

नागपूरचा ‘गड’ गडकरींचाच!

गडकरी यांना ६ लाख ४६ हजार०७५ तर पटोले यांना ४ लाख ३६ हजार ६५८ मते मिळाली

नितीन गडकरी यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्यानेजिंकून नागपूर हा ‘गडकरींचाच गड’ असल्याचे सिद्ध केले.

रामटेकवर पुन्हा सेनेचाच भगवा; काँग्रेसचे पटोले, गजभिये यांचा दणदणीत पराभव

नागपूर : निवडणुका जाहीर झाल्यापासून तर मतमोजणीपर्यंत संपूर्ण देशाचे लक्ष असलेली नागपूरची लढत भाजपचे उमेदवार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्यानेजिंकून नागपूर हा ‘गडकरींचाच गड’ असल्याचे सिद्ध केले.  त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा पराभव केला. गडकरी यांना ६ लाख ४६ हजार०७५ तर पटोले यांना ४ लाख ३६ हजार ६५८ मते मिळाली. गडकरींना यांना मिळालेल्या मतांची  (१७ वी फेरी) टक्केवारी ही एकूण मतदानाच्या ५५.५७ इतकी आहे हे येथे उल्लेखनीय.

दरम्यान रामटेकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी त्यांची जागा राखत रामटेकच्या गडावर पुन्हा भगवा फडकावला. त्यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांचा एक लाखांहून  अधिक मतांनी पराभव केला. पाच वर्षांच्या काळात हजारो कोटींची विकास कामे आणि अनेक देशपातळीवरचे प्रकल्प नागपुरात आणणाऱ्या गडकरी यांच्यासाठी सुरुवातीला सोपी वाटणारी लढत काँग्रेसचे नाना पटोले यांच्या उमेदवारीने चुरशीची झाली.  त्यामुळे देशभराचे लक्ष या लढतीकडे लागून होते. मात्र मतमोजणीत ही चुरस दिसून आली नाही. सुरूवातीपासूनच गडकरी यांनी घेतलेले मताधिक्य शेवटपर्यंत कायम होते.  पहिल्याच फेरीत गडकरी यांना १५ हजार ४१९ मतांची आघाडी होती. त्यांना ४० हजार ४६४ तर पटोले यांना २५ हजार ४५ मते मिळाली. त्यानंतरच्या फेरीत ही आघाडी ३३ हजार २९७ वर गेली. तिसऱ्या फेरी अखेर ती ४५ हजार ८९२ वर गेली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे चेहरे पडले. त्यानंतर सर्वच फेरीत गडकरी यांनी आघाडी घेतली १८ फेरीअखेपर्यंत मताधिक्य २ लाख ९४१७ पर्यंत गेले होते. इतर उमेदवारांमध्ये १७  व्या फेरीअखेर बसपाचे मो. जमाल यांना ३१ हजार १२१, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांना २५,४४४ मते मिळाली होती.

जनादेशाचे स्वागत करतो – पटोले

मी नागपूरकर जनतेचे आभार मानतो. मी कमी वेळात त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला मतांच्या रूपात आशीर्वाद दिला. मी जनादेशाचे स्वागत करतो. निवडणूक जनतेसाठी लढायची असते. यापुढेही लोकांच्या अडीअडचणीत साथ देण्याचा माझा प्रयत्न राहिल.

नागपूरच्या विकासासाठी कौल – गडकरी

जात-पात, धर्मभेद न पाळता नागपूरच्या जनतेने या शहराच्या  विकासासाठी  कौल दिला असून त्यांच्या विश्वासनाल धक्का बसू देणार नाही. कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ म्हणजे हा विजय आहे. त्याचे ऋण मी विसरणार नाही. नव्या जोमाने विकास करणार] अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी विजयानंतर व्यक्त केली.

पटोले राजकीय सन्यास घेणार का?

गडकरी यांचा आपण पाच लाखापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव करू, अन्यथा राजकीय सन्यास घेऊ, असे आव्हान पटोले  यांनी एका वृत्त वाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजप नेते व मंत्री  गिरीश महाजन यांना दिले होते. आता पटोले पराभूत झाल्याने ते राजकीय सन्यास घेणार का असा सवाल महाजन यांनी केला आहे. मात्र गडकरी यांनी पटोले  यांना विरोधी पक्षात काम करण्याचा सल्ला दिला आहे.

तुमाने पहिल्या फेरीपासून आघाडीवर

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराभव केला. तुमाने यांना १८ व्या फेरीअखेर ५ लाख ६० हजार ८१३ तर किशोर गजभिये यांना ४ लाख ४१ हजार ८५६ मते मते मिळाली. तुमाने यांनी १ लाख १८ हजार ९५७ मताधिक्य घेतले होते. बसपाचे सुभाष गजभिये यांना ४२,२२०, वंचित आघाडीच्या किरण रोडगे यांना ३३,८७० मते मिळाली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाच पक्षाने घेतलेली मते काँग्रेसच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. तुमाने सुद्धा पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. शेवटपर्यंत ती कायम होती. यंदा रामटेकमध्ये बदल होईल, अशी शक्यता होती. मात्र तुमाने यांच्या विजयाने ती फोल ठरली.

विकास कामाची पावती – तुमाने

पाच वर्षे मतदारसंघात कामे केली. युवकांच्या रोजगारासाठी विविध प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले. या कामाची पावती म्हणून जनतेने मला पुन्हा संधी दिली, असे मत रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 2:33 am

Web Title: nagpur election results 2019 bjp nitin gadkari defeat congress nana patole
Next Stories
1 लोकसभाजिंकली, विधानसभेच्या तयारीला लागा
2 रामटेकमध्ये सुरुवातीच्या काही फेऱ्यांत चुरशीचा सामना
3 मोदी लाटेतही विद्यमान खासदारांचे मताधिक्य घटले
Just Now!
X