मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; गडकरींच्या निवासस्थानी आनंदोत्सव

नागपूर : राज्यात काँग्रेसने जाती धर्माचे राजकारण करुन भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आपला मतदार संघात विजयी होऊ शकले नाही. या देशात जातीपातीचे राजकारण चालत नाही तर विकासाच्या राजकारणाला महत्त्व दिले जाते हे जनतेने निकालावरुन दाखवून दिले आहे. लोकसभेत यश मिळाले आता विधानसभेची तयारीला लागा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाल परिसरात विजयी सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुंबई शहर अध्यक्ष आशीष शेलार, महापौर नंदा जिचकार, खासदार विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख आदी नेते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नितीन गडकरी यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही त्यामुळे जनतेचे त्यांना प्रचंड मताधिक्यांने निवडून दिले आहे. देशभरात भाजपाचा विजय हा ऐतिहासिक आहे. हा विजय डोक्यात जाणार नाही तर हा  विजय मनात साठवून ठेवू असेही मुख्यमत्री म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, जाती वादाचे विष कालवण्याचे विरोधी पक्षानी केले मात्र सर्व धर्माच्या लोकांना प्रेम दिले  त्या प्रेमातून जनतेने विश्वास टाकत मला जिंकून दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पश्रिम केले. त्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांचा परिश्रमाचा आहे. निवडणूकीत आपण प्रचाराची पातळी खाली जाऊ दिली नाही असेही गडकरी म्हणाले.

सकाळपासून देशभरातील निकालाचे कल येऊ लागताच शहरातील विविध भागात जल्लोश सुरू झाला. भाजपा मोठय़ा विजयाकडे वाटचाल करू लागले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांंमध्ये प्रचंड उत्साह संचारला आणि एक एक करत कार्यकर्ते गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी जमा होऊ लागले. निवासस्थानी मोठा एलएडी  स्क्रीन लावण्यात आला होता. येथे निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांंनी गर्दी केली. सकाळी १० ते ११ वाजतापर्यंत देशातील चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते आणि भाजप व सहयोगी पक्षांना (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून आले तसा कार्यकर्त्यांंचा उत्साह वाढला.  दुपारी नितीन गडकरी यांनी निर्णायक आघाडी घेतल्याची बातमी आली आणि निवासस्थानासमोर ढोल ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण व फटाक्याची आतषबाजी सुरू केली.

महाराष्ट्रातील ही शेवटची पाणी टंचाई – गडकरी

नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करू, सध्या राज्यात तीव्र पाणीटंचाई आहे. मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ती राहणार नाही. ही राज्यातील शेवटची  पाणीटंचाई असेल, अशी ग्वाही, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

विजयानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. देशात आणि राज्यात भाजपला मिळालेला हा अभूतपूर्व विजय असून यात कार्यकर्त्यांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान अधिक आहे. काँग्रेसला फक्त एक जागा राज्यात मिळाली आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर यापुढे आपला भर असेल असे सांगत गडकरी म्हणाले की राज्यात तीव्र पाणीटंचाई आहे. यापूर्वी केंद्र सरकारने राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घसघशीत निधी दिला आहे.