11 November 2019

News Flash

निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती

लोकसभा निवडणुका संपताच वादग्रस्त ‘नमो टीव्ही’ हे चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब झालं आहे. ‘नमो टीव्ही’वरून केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या चॅनलला भाजपाकडून निधी पुरवठा होत असल्याचा आरोप सातत्याने झाला होता. मात्र, लोकसभा  निवडणुकीचा प्रचार थांबताच या चॅनचलं प्रसारण देखील बंद झालं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हणजे २६ मार्च रोजी अचानक सुरू झालेलं हे चॅनल सुरूवातीपासूनच वादात अडकलं होतं. नमो टीव्हीवर केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणे व सभा दाखवल्या जात होत्या.

एप्रिल महिन्यात आयोगाने प्रचार थांबल्यावर म्हणजे मतदानाच्या ४८ तास आधी नमो टीव्हीवर रेकॉर्डेड शो दाखविण्यास मनाई केली. मात्र नमो टीव्हीला निवडणुकीचं थेट प्रक्षेपण दाखविण्यास परवानगी दिली होती. नमो टीव्हीवरील प्रसारणावर आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले होते. तसेच या चॅनलेचे मॉनिटरींग करण्याचेही आदेश देण्यात आले होते. यापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विना परवानगी कोणताही कार्यक्रम नमो टीव्हीवर दाखविण्यास मनाई केली होती. नमो टीव्ही भाजपा चालवत असून त्यामुळे या टीव्हीवरील सर्व रेकॉर्डेड कार्यक्रम विना परवानगी दाखविता येणार नाही, असं आयुक्तांनी म्हटलं होतं. परवानगी शिवाय दाखविण्यात येणारा सर्व कंटेन्ट या चॅनलवरून हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते. याशिवाय काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे चॅनल बंद करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने नमो टीव्हीवरुन मंत्रालयाकडे अहवाल मागून एक नोटीस जारी केली होती. मात्र मतदान झाल्यानंतर हे चॅनल लगेचच अचानक गायब झाल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे.

First Published on May 21, 2019 8:52 am

Web Title: namo tv goes off air as lok sabha polling completed