‘नमो टीव्ही’ ही परवानाप्राप्त दूरचित्रवाहिनी नसून भाजपचे प्रचाराचे व्यासपीठ असल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हे चॅनेल माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक आणि वरिष्ठ राजकीय विश्लेषक पराग शाह यांच्या मालकीचे असल्याचे कळते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना शाह यांनी त्यांच्यासोबत काम केले होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या काही आठवडे आधीच एक दूरचित्रवाहिनी सुरू होणे हे आदर्श आचारसंहितेच्या कक्षेत बसते काय, असा प्रश्न राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला विचारत आहेत. मात्र, परवाना नसलेली एखादी वाहिनी डीटीएच प्लॅटफॉर्म व केबल नेटवर्क कसे दाखवू शकतात, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारकडे नोंदणी न झालेली कुठलीही वाहिनी कुठलेही डीटीएच प्लॅटफॉर्म दाखवू शकत नाही, असे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद केले आहे.

सत्ताधारी पक्ष असल्याचा दुरुपयोग करून भाजपने डीटीएच कंपन्या व केबल नेटवर्कना आपली नमो टीव्ही वाहिनी दाखवण्यास भाग पाडले आहे काय? भाजपने वस्तुत: नियमांमधील संदिग्धतेचा फायदा घेतला आहे, असे माध्यम क्षेत्रातील एका व्यावसायिकाने सांगितले. दरम्यान, या वाहिनीचे संचालन करण्यात आपला किंवा आपल्या कंपनीचा आता काहीही संबंध नसल्याचे ही वाहिनी सर्वप्रथम दाखवणाऱ्या कंपनीच्या मूळ प्रवर्तकांपैकी एक असलेल्या सुजय मेहता यांनी म्हटले आहे.