रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा याही वेळी पराभव झाला. ज्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक निकालावरच शंका घेतली आहे. आम्ही तळकोकणात हरलो असलो तरीही पराभव मान्य नाही असं मत नारायण राणे यांनी म्हटलं आहे. कोकणात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं संशयास्पद आहे असंही राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

गुरूवारी म्हणजेच २३ मे रोजी हेराफेरी झाली आहे असाही आरोप नारायण राणे यांनी केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सगळ्या फेऱ्यांमध्ये ७ हजार ते ८ हजार मतांचा फरक कसा काय दाखवला जात होता? कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड कसा काय नव्हता ? असे प्रश्न उपस्थित करून नारायण राणे यांनी निकाल प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला आहे. तसंच याबाबत निवडणूक निकालाकडे तक्रार करण्याबाबत विचार करतो आहोत असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा मागच्यावेळप्रमाणेच यावेळीही पराभव झाला. हा पराभव नारायण राणे यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण निकाल प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? महाराष्ट्रात काय होणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना धोबीपछाड देत ३०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर एनडीएची बेरीज ३५० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे विरोधकांसाठी गुरूवारचा निकला हा धक्कादायकच मानला जातो आहे. अशात आता नारायण राणे यांनी निकाल प्रक्रियेवरच संशय घेतला आहे.