साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. राजकारण खालावल्याचे हे ज्वलंत उदाहरण असून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची भूमिका काय, हे स्पष्ट झाले पाहिजे. मोदी आणि अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह या भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असून साध्वी प्रज्ञासिंह यांनी गुरुवारी भोपाळमधील एका कार्यक्रमात हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. साधूसंतांचा शाप लागल्यानेच करकरे यांचा सर्वनाश झाला. दहशतवाद्यांनी त्यांना मारल्यानंतर माझं सुतक संपले, असे त्यांनी म्हटले होते. साध्वींच्या या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजकारण खालावल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. एखाद्या गुन्हेगाराचे उदात्तीकरण कसे काय केले जाऊ शकते आणि ते देखील इतक्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील आरोपीचे, असा सवाल त्यांनी विचारला.

२००८ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्यावर ते करकरे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी करकरे यांच्या पत्नीने नरेंद्र मोदींनी दिलेली एक कोटींची मदत नाकारली होती, असा दावा आव्हाड यांनी केला. मग मोदींनी ही मदत देण्याची तयारी का दर्शवली होती, हा प्रेम दिखावा होता का, असा सवाल त्यांनी विचारला. हेमंत करकरे शहीद झाले होते आणि त्यांच्याविषयी असे विधान करणे अयोग्य आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.