मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होत असल्याने प्रत्येक टप्प्यात दोन अशा रीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ प्रचारसभा घेण्याच्या दृष्टीने प्रदेश भाजपचे नियोजन सुरू आहे. सभा कुठे घ्यायच्या आणि त्यात वाढ करण्याबाबतचा अंतिम निर्णय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेणार असून शेवटची सभा मुंबईत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १ एप्रिल रोजी वर्धा येथे सभा होणार आहे. त्यानंतर आणखी एक सभा विदर्भात होईल. म्हणजेच पहिल्या टप्प्यात मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत.  मागील निवडणुकीत केवळ मोदी यांच्या सभेमुळे झालेल्या वातावरणनिर्मितीच्या जोरावर सोलापुरात शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे मोदी यांच्या सभांसाठी राज्यातील अनेक उमेदवार उत्सुक आहेत.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात १४ जागांसाठी तर चौथ्या टप्प्यात १७ जागांसाठी मतदान होणार आहे.