मोदींच्या मतदारसंघात सामान्यांची भावना, काही जण मात्र नाराज

अरुंद घाट ते शहरातील विमानतळाला जोडणारा चौपदरी रस्ता, कर्करोगावर उपचार करणारे रुग्णालय, शहरातील अस्वच्छ भिंतीची जागा उत्तम नक्षीकामाने घेतली आहे. असे बदल वाराणसी फिरल्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये दिसून येतात.

रिक्षाचालक अजयकुमार हा तर पर्यटकांना वाराणसीतील रस्ते पाहण्यास सांगतो. त्यातूनच तुम्ही बदल अनुभवता आहात असे त्याचे मत आहे. २०१४ मध्ये जे पर्यटक शहरात यायचे त्यांच्या दृष्टीने प्रवास करणे एक दिव्य असायचे. मात्र आता सगळेच बदलले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याचे त्याने सांगितले. मुख्य शहरातील प्रमुख ररस्त्यांवरील पदपथांवर आकर्षक दिवे लावण्यात आले आहेत. तुम्ही जर वाराणसीमधील घाट पाहिलेत तर हा बदल जाणवेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक संधी मिळालीच पाहिजे, असे मत ५२ वर्षीय कमल उपाध्याय यांनी व्यक्त केले. अर्थात ३२ वर्षीय अभय यादव याने मात्र गंगा स्वच्छतेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शहरात सुविधा झाल्या याचा अर्थ गंगा स्वच्छ झाली असा होत नाही. थोडा झगमगाट आला असेल, मात्र शहरात मूलभूत बदल झाला आहे असे म्हणता येत नाही, अशी नाराजी त्याने व्यक्त केली. काशी विश्वनाथ मार्गिका प्रकल्पासाठी शेकडो जुनी घरे पाडल्याबद्दल तो नाराज आहे. अनेक शतकांचा हा आमचा वारसा आहे. तो जतन करायला हवा होता अशी त्याची भावना आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन ८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. वाराणसी मतदारसंघासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पात काही घरे पाडली आहेत. मात्र, काही मोठे उद्दिष्ट गाठायचे असेल तर थोडा त्याग करावाच लागतो, असे पुस्तक दुकानदार अमित सिंह यांनी सांगितले.

वाराणसीमध्ये रविवारी मतदान होत आहे. पंतप्रधानांना पुन्हा संधी देण्याबाबत वाराणसीतील नागरिकांमध्ये मतभिन्नता आहे. २१ सूरज प्रजापती पहिल्यांदाच मतदान करणार आहे. आम्ही पदवीधर झाल्यावर नोकरी देणे हे सरकारचे काम नाही काय? असा त्याचा सवाल आहे. नोकरी मिळाली नाही तर आम्ही पकोडे तळायचे? असे तो विचारतो. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या रामचंद्र पटेल यांनी राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. मोदी सरकारने  त्याबाबत जबाबदारी पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. अशोक पांडे या रिक्षाचालकाने नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. मोदी व त्यांच्या पक्षाने मोठी आश्वासने दिली होती. मग काळा पैसा कुठे आहे? असा त्याचा सवाल आहे. तीन तारांकित हॉटेलचे मालक असलेले कृष्णा मुरारी सिन्हा यांनी सरकारने राष्ट्रवादी व राष्ट्रद्रोही अशी विभागणी करू नये असे बजावले.