पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या विकासात ममता बॅनर्जी अडथळा ठरत असल्याचं सांगताना स्पीड ब्रेकर असा उल्लेख केला होता. ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देत नरेंद्र मोदी एक्स्पायरी बाबू असल्याचा टोला लगावला आहे.

‘नरेंद्र मोदी एक्स्पायरी बाबू आहेत. त्यांचं सरकार आता संपलं आहे. टीएमसी सरकारने गरिबांसाठी काहीच केलं नसल्याचा आरोप तुम्ही करत आहात, पण तुम्ही गेल्या पाच वर्षांत काय केलं ? दर दिवशी खोटं बोलू नका’, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

याआधी सिलिगुडी येथे बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, ‘इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गतीने विकास होऊ शकला नाही हे खरं आहे. याचं कारण पश्चिम बंगालमध्ये स्पीड ब्रेकर आहे ज्याला दीदी म्हणून ओळखलं जातं. त्यांना गरिबी हटवायची नाही आहे. जर गरिबी संपली तर त्यांचं राजकारणही संपेल. त्यांना गरिबी पहायची आहे आणि यामुळे त्यांनी गरिबांसाठी सुरु असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत’.

पुढे बोलताना त्यांना सांगितलं की, ‘ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या ज्या योजना थांबवल्या आहेत त्यांची यादी मोठी आहे. त्यांनी आयुष्यमान योजना रोखली ज्यामध्ये गरिबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. याशिवाय त्यांनी ७० लाख शेतकऱ्यांना फायदा पोहोचवणारी योजनाही थांबवली. तसंच बिल्डर्सना ग्राहकांची लूट कऱण्यापासून रोखणाऱ्या रेराची (RERA) अंमलबजावणी करण्यासही त्यांनी नकार दिला’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

नरेंद्र मोदींनी यावेळी डाव्या पक्षांवरही टीका केली. डावे आणि ममता बॅनर्जी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. पण त्यांनी आपला सामना चौकीदारशी आहे हे विसरु नये असा इशाराही यावेळी दिला. नरेंद्र मोदींनी यावेळी चीट फंड स्कॅमचा उल्लेख केला तसंच एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल टीका केली.

‘बंगालमध्ये चीट फंड स्कॅम झाला ज्याच्या माध्यमातून टीएमसी नेत्यांनी लोकांची लूट केली. ममता बॅनर्जी यांनी आपल्या नेत्यांना लोकांनी मेहनतीने कमावलेले पैसे लुटण्यास मदत केली. आम्ही जेव्हा बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला तेव्हा आपलेच लोक रडू लागले होते. जखमी दुसरीकडे कुठे तरी झाली असताना तुम्ही का रडत आहात ? दीदींना हे आवडलं नाही. महाआघाडातील नेत्यांनाही हे आवडलं नाही. ते पाकिस्तानात हिरो झाले आहेत’, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.