21 October 2019

News Flash

मोदी सर्वात अपयशी पंतप्रधान – भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

संग्रहित छायाचित्र

कर्जत : नरेंद्र मोदी हे  देशाचे सर्वात अपयशी पंतप्रधान म्हणून ओळखले जातील,  असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्रीगोंदा येथे  केले.

सोमवारी  सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.  संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे , अनुराधा नागवडे, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, शुभांगी पोटे,  प्रशांत दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली, ते म्हणाले की आम्ही सर्व शेतकरी व या देशातील नागरिक हे मालक आहोत,  मतदार हा मालक आहे त्यामुळे आम्ही मालक राहणार,  चौकीदार होणार नाही आणि देशाचा सध्याचा  चौकीदार हा साधासुधा नसून तो दहा लाख रुपयांचा नुसता सूट घालतो आणि या चौकीदाराच्या काळात संरक्षण विभागांमधून महत्त्वाची कागदपत्रे चोरीला जातात अशा पद्धतीचा चौकीदार आता आपल्या उपयोगाचा नाही. त्यामुळे देशामध्ये आता काँग्रेस व राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे सरकार येणार असून जनतेनेच मोदी हटाव ही मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी हे पुलवामासारख्या दुर्दैवी घटनेत सैनिकांच्या नावावर घाणेरडे राजकारण देशामध्ये करीत आहेत.

भाजपवाल्यांनी यापूर्वी एका गांधीची हत्या केली होती आता नगरमध्ये दुसऱ्या गांधीची हत्या करून देशामध्ये यांचा गांधीद्वेष पुन्हा एकदा दिसून आला आहे. भाजपला अनेक मतदारसंघात उमेदवार नव्हते म्हणून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उसन्या लोकांना उमेदवारी दिली आहे. ही पोरे पळवणारी टोळी असून त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

भुजबळ पुढे म्हणाले की  सुजय विखे यांना काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी देत असताना सुद्धा त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली यामध्ये त्यांचा  हेतू वेगळा होता हे दिसून आले आहे.

आमदार राहुल जगताप म्हणाले की देशातल्या व राज्यातल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची सर्वात मोठी फसवणूक केली आहे. शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी देतो असे त्यांनी सांगितले पण काही केले नाही त्यामुळे  शेतकरी आत्महत्या करीत आहे. एवढेच नव्हे तर यांनी या देशातील व्यापाऱ्यांना जीएसटीच्या नावाखाली, जाती धर्मातील लोकांना आरक्षणाच्या नावावर फसवले. उमेदवार आमदार संग्राम जगताप म्हणाले की,  मी या भागाचा भूमिपुत्र आहे तेव्हा भूमिपुत्राला आपली सेवा करण्याची संधी द्यावी.  २३ तारखेपर्यंत सर्व मतदारसंघात पोहोचू शकणार नाही, मात्र पुढील पाच वर्षांमध्ये आपण साधा फोन जरी केला तरी  मी आपणासाठी हजर राहील.

First Published on April 16, 2019 4:40 am

Web Title: narendra modi is the most failed prime minister says chhagan bhujbal