काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं असून गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेताना संपूर्ण मंत्रीमंडळाला रेस कोर्स रोड येथे टाळं लावून बंद केलं होतं असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. हिमाचल प्रदेश येथील सोलान येथील प्रचारसभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी ज्यांना ज्ञान आहे त्यांचं न ऐकता, स्वत:च्या जगात असतात असा टोलाही यावेळी राहुल गांधींनी लगावला.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशाच्या अर्थव्यवस्थेला मार्ग दाखवला. ७० वर्षांपासून आरबीआय अस्तित्त्वात आहेत. आरबीआयकडे देशाच्या अर्थव्यवस्थेची योग्य माहिती आहे. पण त्यांना न विचारता नोटाबंदी करण्यात आली’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, ‘नोटाबंदी निर्णयावेळी नरेंद्र मोदींनी संपुर्ण मंत्रीमंडळाला रेस कोर्स येथे टाळं लावून बंद केलं होतं. विशेष सुरक्षा दल (एसपीजी) माझीही सुरक्षा करतं. त्यांनीच मला ही माहिती दिली’. यावेळी राहुल गांधी यांनी अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख करत त्यांच्याकडे अनुभव असल्याचं सांगितलं. आमची विचारधारा वेगळी आहे, आम्ही एकमेकांविरोधात लढतो, पण त्यांच्याकडे अनुभव आहे अशी स्तुती केली.

यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकसंबंधी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे इतकं ज्ञान आहे की, त्यांनी हवाई दलाच्या लोकांना सांगितलं घाबरु नका, ढगांमुळे आपल्याला फायदा होईल. ढगांमुळे रडार विमानांना ट्रॅक करु शकणार नाही. ज्यांना कळतं त्यांचं ऐकत नाहीत, फक्त आपल्याच जगात वावरत असतात’, असा टोला राहुल गांधींनी लगावला.