06 December 2019

News Flash

काँग्रेसकडून लोकांचा विश्वासघात – पंतप्रधान मोदी

राजस्थानमधील निवडणूक प्रचारसभेत आरोप

राजस्थानमधील निवडणूक प्रचारसभेत आरोप

देशाच्या वृद्धीची क्षमता आणि त्याची संसाधने यांच्याबाबत अन्याय करून काँग्रेसने लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमधील निवडणूक प्रचारसभेत केला.

स्वातंत्र्यानंतर लोकांनी पाच दशके काँग्रेसवर विश्वास ठेवला, पण या पक्षाने लोकांचा विश्वासघात केला. देशातील संसाधने आणि क्षमता याबाबत अन्याय करण्यात आला. काँग्रेसने मतपेढीचे राजकारण केले आणि सत्तेचा वापर आपली तिजोरी भरण्यासाठी केला, असे राजस्थानच्या चित्तोडगड मतदारसंघातील प्रचारसभेत मोदी म्हणाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्याच काळात ज्या लहान राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले, त्यांनी भारतापेक्षा बरीच प्रगती केली आहे, असा दावा मोदी यांनी केला. काँग्रेसचे आचरण आणि संस्कृती यांमध्ये तीन गोष्टी आहेत व त्या म्हणजे नामदार परिवार (राजघराण्याचे कुटुंब), भ्रष्टाचार आणि भरपूर खोटी आश्वासने, अशी टीका मोदी यांनी केली.

आपल्या सरकारने पाच वर्षांमध्ये यंत्रणा (सिस्टिम) बदलली असून, लोकांसाठी अनेक योजना व कार्यक्रम सुरू करून त्यांची यशस्वी अंमलबजावणीही करण्यात आली आहे आणि त्यांच्यामुळे लोकांना फायदा झाला आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला.

आम्ही गरिबी, रोगराई, अशिक्षितता, भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद यांच्याशी लढा दिला. देशवासीयांच्या समन्वित प्रयत्नांमुळेच आम्ही या लढाया जिंकत आहोत, असे मोदी म्हणाले. देशात अभूतपूर्व अशी लाट असून, निवडणुका पक्ष किंवा उमेदवारांकरवी नाही, तर उज्ज्वल भवितव्य हवे असणाऱ्या नागरिकांकडून लढल्या जात आहेत, असे यावेळी मोदी म्हणाले.

First Published on April 22, 2019 1:25 am

Web Title: narendra modi on congress party 4
Just Now!
X