भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी बंगालमधील सभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा एमआयएम पक्षाचे नेते अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘त्यांचे हवाई दल’ पाठवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्याचे वक्तव्य शाह यांनी केले होते. ‘मागील पाच वर्षात जे काही देशाचे होते ते सगळे मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत’ असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

बंगालमधील एका सभेमध्ये अमित शाह राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बोलत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. आधी अशा हल्ल्यांनंतर काहीच कारवाई केली जात नसे. मात्र या हल्ल्यानंतर १३ व्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांच्या हवाई दलाला आदेश दिले. त्यानंतर आपल्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानीमधील दहशवाद्यांच्या चिंध्या उडवल्या.’ यावरुनच ओवैसींनी मोदींना ट्विटवरुन लक्ष्य केले आहे. ‘मोदींची सेना, मोदींचे हवाई दल, मोदींचा अणुबॉम्ब… पाच वर्षात जे काही देशाचे होते ते मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवतायत की पबजी खेळतायत’ असे ट्विट ओवैसी यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डललाही टॅग केले आहे.

नक्की वाचा >> मोदींच्या हवाई दलाने पाकिस्तानवर केला हल्ला: अमित शाह

दरम्यान बंगालमधील भाषणात शाह यांनी भरातीय हवाई दलाचा उल्लेख मोदींचे हवाई दल असा केला आहे. तसेच दहशतवाद्यांना त्यांच्या घरात म्हणजेच पाकिस्तानात घूसून त्यांचा खात्मा करत दहशतवाद मुळापासून संपवण्याच्या निर्णय भाजपा सरकारने घेतल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.