शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व दीडपट हमीभावाचे आश्वासन 

अकोला : भारतीय जनता पक्ष जवानांच्या कर्तृत्व व शौर्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करीत आहेत. पंतप्रधान मोदी पांढरकवडा येथे प्रचारासाठी आले, पण पुलवामात बलिदान देणाऱ्या बुलढाणा जिल्हय़ातील शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले नाही. प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांसाठी मोदींकडे वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून मोदींवर निशाणा साधला.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी बुलढाणा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार राहुल बोंद्रे, दिलीपकुमार सानंदा आदी  यावेळी उपस्थित होते.

भाजप सरकारमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करून शरद पवार पुढे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकासह काही लगतच्या देशात लोकशाही धोक्यात आणून हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न झाला. भारतात आजपर्यंत लोकशाहीच्या चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न कोणी केला नव्हता. घटनेनुसारच सत्ताधाऱ्यांनी कारभार चालवला. भाजपकडून वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे भाजपला सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारने कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. मात्र, अनेकांना कर्जमाफी मिळाली नाही. आम्ही सत्तेत आल्यास सरसकट कर्जमाफी व शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ. यापूर्वी आम्ही करून दाखवले आहे. ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली. २००९ मधील कर्जमाफीनंतर सकारात्मक बदल होऊन दोन वर्षांच्या आत तांदूळ, गहू आणि कापूस निर्यातीत जगाच्या पहिल्या तीन देशांत भारताचा समावेश झाला. भाजप सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांसाठी विपरीत चित्र निर्माण झाले. कर्जबाजारीपणा वाढला. दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे देशासाठी चांगले चित्र नाही.

मोदी सरकारच्या दाव्यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका ही छप्पन इंचाच्या छातीमुळे नव्हे तर जागतिक स्तरावरून पाकिस्तानवर आलेल्या दबावामुळे झाली. मोदी यांचा खरोखरच एवढा प्रभाव असेल तर पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या महाराष्ट्राच्या कुलभूषण जाधव यांची सुटका त्यांनी करून दाखवावी.

गोपनीयतेच्या नावाखाली राफेल कराराची माहिती भाजपने दडवून ठेवली. संसदेत त्याची माहिती देण्यात आली नाही. मात्र, नंतर कागदपत्रांचे छायाचित्र प्रसारमाध्यमांमध्ये येते. याउलट बोफोर्स प्रकरणात पारदर्शक चौकशी केल्यानंतर त्यातील सत्य समोर आले होते, असा दावा करून राफेल प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

परिवर्तनाची लाट

गुजरातच्या विकासाचे मॉडेल समोर करून २०१४ मध्ये नरेंद्र मोदी समोर आले. त्यावेळी देशातील जनतेला मोदी कसे आहेत, याची कल्पना नव्हती. आता सर्वसामान्यांना मोदींचा चांगलाच अनुभव आल्याने देशभर परिवर्तनाची लाट असल्याचा दावा शरद पवार यांनी केला.