वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापुरातील कष्टकरी कामगारांच्या ३० हजार घरांचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या स्टेजवरील उपस्थितीमुळे सोलापुरसह राज्याच्या राजकरणात बरीच चर्चा रंगली होती. यासाठी आडम मास्तरांवर पक्षाने तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाईही केली होती. त्यानंतर अनेक चर्चेला उधान आले होते. मात्र, आता आडम मास्तर यांनी आपण स्टेजवर जाण्यामागचे कारण Loksatta.com शी बोलताना स्पष्ट केले.

मास्तर म्हणाले, तो स्टेज भारतीय जनता पार्टीचा नव्हता. ९ जानेवारी रोजी झालेला कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारचा कार्यक्रम होता. ३० हजार घरांच्या पाया भरणीला जर मी बहिष्कार टाकला असता आणि त्याचे परिणाम उलटे झाले असते तर कामगारांनी मला दोष दिला असता. भाजपा पक्षाशी अथवा कार्यक्रमाशी माझा अथवा पक्षाचा कोणताही सबंध नाही. सरकारचा कार्यक्रम असल्यामुळे मी तिथे उपस्थित राहिलो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबददल कृतज्ञता व्यक्त केली यापलिकडे वेगळे काहीही कारण नव्हते.

भाजपा आणि आमच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही त्यांना एक नंबरचे राजकीय शत्रू मानतो, त्यामुळे माझ्या भाजपा प्रवेशाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्या घटनेवरुन झालेला वाद हा निरर्थक होता. त्याला उगाचच राजकीय हवा देण्यात आली, असे आडम मास्तरांनी स्पष्ट केले.

सोलापूरातील राजकरणावरही यावेळी त्यांनी आपली भुमिका मांडली. मास्तर म्हणाले, सोलापूरमध्ये तिरंगी लढत असल्याची चर्चा आहे. मात्र, इथे खरी लढत भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीमध्येच आहे. सुशीलकुमार शिंदे स्पर्धेतच नाही. आमच्या पक्षाचा आणि माझा सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा आहे. मात्र, राज्यातील त्यांच्या इतर उमेदवारांना आमचा पाठिंबा नसेल. सोलापुरातील दलित- मुस्लिम लोक एकवटले आहेत. त्यामुळे इथे प्रकाश आंबेडकर यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे.