नाशिक : सकाळपासून ते सायंकाळपर्यंतच्या मतमोजणीत सर्व फेऱ्यांमध्ये आघाडी कायम राखत नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी एक लाख ८७ हजार, तर दिंडोरीत डॉ. भारती पवार यांनी पावणेदोन लाखाचे मताधिक्य मिळवत विजयाचा मार्ग सुकर केला. दोन्ही मतदारसंघांत महायुती वर्चस्व राखण्याच्या मार्गावर आहे.

विरोधी महाआघाडी, माकप आणि वंचित बहुजन आघाडीसह भाजपचे बंडखोर उमेदवार स्पर्धेतही राहिले नाहीत. नाशिकमध्ये याआधी केवळ एकदाच सलग दोन वेळा एकाच उमेदवाराच्या गळ्यात विजयश्रीने माळ घातली आहे. तसे यश मिळविणारे गोडसे हे केवळ दुसरे उमेदवार ठरणार आहेत. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतपेटीत बंद झालेल्या एकूण २६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी मतमोजणी प्रक्रियेतून झाला. गेल्यावेळी हे दोन्ही मतदारसंघ सेना-भाजप युतीने जिंकले होते. यावेळी ते राखले जातील की नाही, याकडे सर्वाचे लक्ष होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर वाढणाऱ्या मताधिक्याने त्यावर वर्चस्व राखण्यात युती यश मिळविणार हे निश्चित झाले. संथपणे सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीची आकडेवारी ११ वाजता जाहीर झाली. नाशिकमध्ये १८ उमेदवार रिंगणात आहेत.

महायुतीचे हेमंत गोडसे, महाआघाडीचे समीर भुजबळ, वंचित बहुजन विकास आघाडीचे पवन पवार आणि भाजप बंडखोर माणिक कोकाटे यांच्यात जोरदार लढत होईल, असा अंदाज वर्तविला गेला. परंतु प्रत्यक्षात महायुती एकहाती बाजी मारत असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या फेरीत गोडसेंनी समीर भुजबळ यांच्यावर सुमारे नऊ हजारांचे मताधिक्य मिळवले. पुढील प्रत्येक फेरीत गोडसेंचे मताधिक्य वाढत गेले. ११ व्या फेरीत गोडसेंनी एक लाखाच्या मताधिक्याचा टप्पा ओलांडला. १६ व्या फेरीत त्यांनी दोन लाखांचा टप्पा ओलांडला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत १५ व्या फेरीच्या प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार गोडसे यांना तीन लाख ६३ हजार ३७०, तर भुजबळ यांना एक लाख ९४ हजार ७२० मते मिळाली. वंचित आघाडीचे पवार यांना ६६ हजार ४४०, तर कोकाटेंना ९६ हजार ४५६ मते मिळाली. अजून ११ फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी असून ती झाल्यानंतर व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठय़ांची पडताळणी होऊन अधिकृत निकाल जाहीर होईल.

नाशिकप्रमाणे दिंडोरी मतदारसंघातही महायुतीच्या डॉ. भारती पवार यांनी लक्षणीय मते खेचून जोरदार आघाडी घेतली. पहिल्या फेरीत ११ हजारांची त्यांची आघाडी २० व्या फेरीत एक लाख ७६ हजारहून अधिक मतांवर पोहोचली. २० व्या फेरीपर्यंत पवार यांना चार लाख ९८ हजार ९४५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाआघाडीचे धनराज महाले यांना तीन लाख २२ हजार ३६२, तर माकपचे जिवा पांडू गावितांना ९० हजार ७९८ मते मिळाली. बाराव्या फेरीत पवार यांनी एक लाखाच्या मताधिक्याचा टप्पा ओलांडला.  आणखी पाच फेऱ्यांची मोजणी बाकी असली तरी मताधिक्यातील फरक पाहता डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून महायुती या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम राखण्याच्या मार्गावर आहे.

तिरंगी लढतीमुळे चुरशीची लढत होईल हा अंदाजही मतमोजणीत फोल ठरला. निकालाचा अंदाज आल्याने गावित यांनी मतमोजणी केंद्रातून निघून जाणे पसंत केले. नाशिक मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अ‍ॅड. कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे यांनीही केंद्रातून काढता पाय घेतला.