नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा या निवडणूक लढवत आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे म्हटले होते. त्यानंतरही वाद निर्माण झाला होता. नथुरामबाबत प्रश्न विचारला असता प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामला देशभक्त म्हटलं आहे.

 

एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दीवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. खोट्या आरोपांखाली मला तुरुंगात धाडण्यात आले तेव्हा माझे सुतक सुरू झाले होते. ज्या दिवशी करकरेंना दहशतवाद्यांनी ठार केले तेव्हा माझे सुतक संपले असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. या वक्तव्यामुळे बराच मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद शमलेला नसतानाच साध्वी प्रज्ञा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमल हासन याने नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे वक्तव्य केले. याच वक्तव्याचा साध्वी प्रज्ञा यांनी समाचार घेतला आणि जे लोक नथुरामला दहशतवादी समजतात त्यांना धडा शिकवला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.