महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे दहशतवादीच होता असं आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना यासंदर्भातला प्रश्न विचारण्यात आला. ज्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातला पहिला हिंदू दहशतवादी होता असं वक्तव्य अभिनेते कमल हासन यांनी केलं होतं. यानंतर साध्वी प्रज्ञा यांना याबाबत विचारलं असता त्यांनी नथुराम गोडसे देशभक्त होता असं वक्तव्य केलं होतं. मात्र पक्षाने झापल्यावर त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. आता प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम दहशतवादीच होता असा दावा केला आहे. तसंच हे कुणालाही सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात चर्चेसाठी यावे असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

नथुराम गोडसे यांच्या देशभक्ती आणि दहशवादी असण्याबद्दल वाद सुरु असताना प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे हा दहशतवादीच होता, असे म्हणत आंबेडकर यांनी हे कोणाला हे सिद्ध करून पाहिजे असल्यास त्यासाठी कोठेही चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे आव्हानही त्यांनी दिले. भाजपची नथुराम गोडसेच्या बाबत बदलेली भूमिका ही गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली आहे असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान आगामी  विधानसभेच्या तयारीचा आढावा आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांकडून येथे घेतला. विधानसभा निवडणूक युती, आघाडीविना लढवली जाईल, असे संकेत त्यांनी दिले. त्याबाबत ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीला मिळालेला प्रतिसाद पाहता विधानसभेच्या सर्व जागा जनता दल,आणि एमआयएमच्या साथीने लढवणार आहे. आता आघाडी – युतीसाठी कोणाकडे स्वतःहून जाणार नाही. पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठींबा द्यायचा हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट करू असे त्यांनी स्पष्ट केले.

साध्वी प्रज्ञा यांनी  नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांनी याआधी शहीद करकरे यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तो वाद शमला नाही तोच त्यांनी नथुरामला देशभक्त ठरवून नव्या वादाला तोंड फोडलं. भाजपाने मात्र साध्वी प्रज्ञा यांना पाठिंबा न देता ही पक्षाची भूमिका नाही असे म्हटले. पक्षाने कानउघडणी केल्यावर त्या ताळ्यावर आल्या. त्यांनी माझी आणि पक्षाची भूमिका एकच असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता आज प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम दहशतवादीच होता असे म्हटले आहे आणि ते कुणाला सिद्ध करून हवे असल्यास आपण कोणत्याही चौकात चर्चेसाठी तयार आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.