भाजपशी पुन्हा केलेली युती आणि त्याआधी सरकारवर केलेली टीका याचा प्रभाव प्रचारावर पडू नये यासाठी बालाकोटमध्ये मोदी सरकारने केलेले हवाई हल्ले आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पूर्वीच्या भ्रष्टाचारावरील हल्ल्यांवर आपल्या प्रचाराचा रोख ठेवण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.

शिवसेना यंदा २३ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत लढत आहे. त्यापैकी ११ मतदारसंघांमध्ये शिवसेनेची लढत राष्ट्रवादीशी होत आहे. त्यात परभणी, उस्मानाबाद, कोल्हापूर, मावळ, शिरूर, नाशिक, बुलढाणा आदी मतदारसंघांचा समावेश आहे.

गेल्या पाच वर्षांतील केंद्र सरकारच्या कामगिरीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी तिखट टीका केली होती. त्यानंतर युती झाल्याने आता कामगिरीवर जास्त भर देऊन विरोधकांना फाटे फोडण्याची संधी द्यायची नाही, असे शिवसेनेने ठरवले आहे. या उलट उरी हल्ल्यानंतरचे सर्जिकल स्ट्राईक व नंतर पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा उल्लेख केल्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला.  त्याचबरोबर राष्ट्रवादीशी सर्वाधिक मतदारसंघात लढत असल्याने शरद पवार, अजित पवार आदी नेत्यांवर टीका केल्यावर प्रतिसाद मिळत असल्याचे सुरुवातीच्या सभांमध्ये लक्षात आले. त्यामुळे आता नियोजनबद्धरीत्या शिवसेनेच्या प्रचारसभांत हवाई हल्ले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ले यावरच भर देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. उस्मानाबादसारख्या ठिकाणी तर पवनराजे निंबाळकर हत्याकांड व त्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कथित सहभागाचा आरोप यावर जाणीवपूर्वक भर देऊन पद्मसिंह पाटील व राणा जगजीतसिंह यांच्याविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोठय़ा प्रचारसभा असोत की इतर नेत्यांच्या मतदारसंघातील छोटय़ा सभा, मेळावे सर्व ठिकाणी बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांच्या मुद्दय़ावर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस व त्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे घोटाळे लोक अद्याप विसरले नाहीत. त्यांच्यावर राग आहे असे प्रचारात दिसून येत आहे.

-नीलम गोऱ्हे,आमदार