आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि ओदिशात नवीन पटनायक पुन्हा सत्तेत येणार का, याची उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये आंध्रात चंद्राबाबू यांचा पराभव होऊन जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत येईल, तर ओदिशात नवीन पटनायक हे सत्ता कायम राखतील, असा अंदाज आहे.

आंध्र प्रदेशमध्ये सत्ता कायम राखण्याचे चंद्राबाबू नायडू यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये चंद्राबाबू यांना सत्ता कायम राखणे शक्य होणार नाही, असे अंदाज वर्तविण्यात आले असले, तरी चंद्राबाबू मात्र पूर्ण आशावादी आहेत. चंद्राबाबूंच्या दिल्लीतील गाठीभेटी सुरूच आहेच. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, शरद यादव आदी नेत्यांच्या भेटी घेतल्यावर अखिलेश यादव, मायावती आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटी घेतल्या.

ओडिशाकडे भाजपचे लक्ष

ओदिशात गेली १९ वर्षे मुख्यमंत्रिपदी असलेल्या नवीन पाटनायक यांच्यासमोर भाजपने आव्हान उभे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ओदिशात विशेष लक्ष घातले होते. पण १४७ सदस्यीय ओदिशा विधानसभेत सत्ताधारी बिजू जनता दलाला ८० ते ८५ जागा मिळतील, असा अंदाज स्थानिक वृत्तवाहिन्यांनी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविला आहे. नवीन पटनायक हे सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरू शकतात, पण त्याच बरोबर भाजप ओदिशात चांगली कामगिरी करेल, असाही अंदाज आहे. भाजप २५ ते ३० जागा जिंकेल, असा अंदाज आहे. एवढय़ा जागा जिंकल्यास भाजपसाठी हा मोठा विजय असेल.

भाजपला केंद्रात पूर्ण बहुमत न मिळाल्यास प्रादेशिक पक्षांची आवश्यकता भासू शकते. या परिस्थितीत बिजू जनता दल भाजपच्या मदतीला येऊ शकते.

जगनमोहन यांना पदयात्रेचा लाभ..

आंध्र प्रदेशातील १७५ पैकी १०६ जागा जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला मिळतील, असा अंदाज स्थानिक वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक तिन्ही वृत्तवाहिन्यांनी चंद्राबाबू नायडू पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असे भाकीत व्यक्त केले आहे. चंद्राबाबू यांना शह देण्यासाठीच भाजपने पडद्याआडून जगनमोहन यांना अप्रत्यक्षपणे मदत केली होती. २००४ मध्ये चंद्राबाबू यांचा  पराभव करून जगनमोहन यांचे वडील आणि काँग्रेस नेते राजशेखर रेड्डी हे सत्तेत आले होते. तेव्हा त्यांनी राज्यभर पदयात्रा काढली होती. या वेळी जगनमोहन यांनीही वडिलांप्रमाणेच पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधला आहे.