नवज्योतसिंग सिद्धू यांची काँग्रेससाठी ‘फलंदाजी’
पोटात अन्नाचा कण नाही आणि योग प्रशिक्षण दिले जात आहे. खिशात पैसे नाही आणि बँकेत खाते उघडून दिले जात आहे. भूक शिल्लक असताना शौचालय बांधले जात आहे. मनात जाती-धर्माची घाण आहे आणि स्वच्छ भारत निर्माण करण्याची घोषणा होत आहे. ‘सुना हैं सरहद पर तनाव हैं, पता तो करो क्या चुनाव हैं’ अशा शब्दांत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर टीका केली. शहरातील पैठण गेटपासून प्रचारफेरी काढत किराडपुरा येथे काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शहराच्या मध्यवर्ती पैठण गेट येथे गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात दुचाकी फेरी काढून नवज्योतसिंग सिद्धू यांनी मतदारांना अभिवादन केले. किराडपुरा येथे उभारलेल्या व्यासपीठावर आल्यानंतर हवेत फलंदाजी करत असल्याचा इशारा करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणात शेरोशायरीच्या अंदाजात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना भाजपने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या योजनांची खिल्ली उडवली. जीएसटी आणि नोटबंदी हा जर तुमचा मुद्दा होता, तर त्या मुद्दय़ावर निवडणूक का लढवली नाही, असा सवाल त्यांनी केला. बाहेरचे लोक येतील, तुमच्यामध्ये फूट निर्माण करतील. ती होऊ नये म्हणून प्रयत्न करा. एकजूट होऊन मतदान करा तरच संविधान वाचेल. संविधान वाचविण्याची पात्रता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्येच असल्याचा दावाही त्यांनी केला. या वेळी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नारायण पवार, राजेंद्र दर्डा आदींची उपस्थिती होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 21, 2019 1:54 am