मल्या, मोदी यांच्या छायाचित्रांमुळे चित्रफितीला निवडणूक विभागाने मनाई केल्याचा आरोप

ठाणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रफितीला निवडणूक विभागाच्या मीडिया सेंटरने परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या चित्रफितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे व्यंगचित्र, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांचे छायाचित्र वापरल्यामुळे परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केला असून याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप न केल्यास निवडणूक प्रचारच बंद करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार रंगात आला असतानाच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागावर गंभीर आरोप केले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक चित्रफीत तयार करण्यात आली आहे. या चित्रफितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्यंगचित्र आहे. तसेच कर्ज घोटाळय़ातील आरोपी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांचीही छायाचित्रे यात वापरण्यात आली आहेत. या कारणामुळे ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व निवडणूक विभागाच्या मीडिया सेंटरचे सेक्रेटरी मिलिंद दुसाने यांनी या चित्रफितीला परवानगी नाकारली आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. निरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या छायाचित्रावर आक्षेप घेता, हे दोघे काय स्वातंत्र्यसैनिक आहेत का, असा टोलाही त्यांनी लगावला.

नंदलाल प्रकरणाच्या फलकास चार दिवसांनी उशिरा परवानगी देणे, प्रचाराच्या उर्वरित तीन फिल्मला परवानगीसाठी ताटकळत ठेवणे, प्रचार साहित्याला जाणीवपूर्वक उशिरा परवानगी देणे, हे सारे प्रकार सुरळीत सुरू असलेल्या निवडणुकीच्या कामात खोडा घालणे आणि एका विशिष्ट पक्षाला फायदा व्हावा यासाठी दुसाने हे करीत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

अस्तित्वात नसलेल्या इमारतींमध्ये मतदारांची नावे, निवडणूक याद्यांमध्ये घोळ याकडे लक्ष देण्याऐवजी मतदान कसे कमी होईल तसेच मेहनत करणाऱ्यांना निराश करून निवडणूक प्रचारातून थांबविण्याचा प्रयत्न काही निवडणूक अधिकारी करीत आहेत.

– जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही चित्रफितींची छाननी करून त्यांना परवानगी देत आहोत. राष्ट्रवादीने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या चित्रफितींना ४८ तासांत मंजुरी दिलेली आहे. तसेच कोणताही पक्षपातीपणा केला जात नाही.

– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.