राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची माळेगावमध्ये सभा झाली. या सभेमध्ये अजित पवार विरोधकांवर टिका करत असतानाच अचानक तेथे भाजपा उमेदवाराची प्रचार करणाऱ्या गाड्या आल्या. सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या असणाऱ्या कांचन कुल यांचा प्रचार करणाऱ्या दोन गाड्या सभा सुरु असलेल्या ठिकाणा जवळून जात असतानाच अजित पवारांनी ऐन रंगात आलेले भाषण थांबवले.

कांचन कुल यांचा प्रचार करणाऱ्या गाड्या तेथून थोड्या पुढे सरकल्यानंतर अजित पवारांनी खास शैलीत टोला लगावला. ‘अजित पवार काय म्हणतायत हे ऐकायला ते आलेत. आरं अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटन दाबशील. माईकवर पण तू सांगशील आता ती नको घड्याळ घड्याळ घड्याळ,’ असं अजित पवार म्हणाले. पवार यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बारामतीकरांनो या निवडणुकीमध्ये भाजपाला असं उत्तर द्या की पुन्हा सत्ताधारी भाजपा नेत्यांनी इतकं फिरकलंही नाही पाहिजे. बारामतीच्या नादाला नको लागायला असं त्यांनी म्हटलं पाहिजे. बारामतीला दृष्ट लागू नये म्हणून ते आले की उलटी बाहुली टांगा असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

बारामतीमध्ये पवार विरुद्ध कुल

दरम्यान बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असून शरद पवार यांनी तब्बल सहा वेळा बारामती लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघातून यंदा खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपाने सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. कांचन कुल या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. कांचन कुल यांचे वडील हे अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला होता. दोन्ही माहेरवाशिणी मधली ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांची ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे. याआधी सलग दहा वर्षं त्या खासदार आहेत.