राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गृहयुद्ध सुरु असून अजित पवार पक्षावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वर्ध्याच्या सभेत केला. या आरोपाला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणून त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळयांच्या आरोपांची उदहारणे दिली.