डॉ. अमोल कोल्हे यांचा इमान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराजांशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड जातीतील लोकांना घेऊन केली आहे. अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की अमोल कोल्हे हे शिवरायांचे भक्त आहेत अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुनावले.

शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी बुधवारी तळेगाव ढमढेरे, मांढवगण खराटा ( तालुका शिरूर ) येथे जाहीर सभा घेतली. या सभेत मुंडे म्हणाले, कोल्हे आणि माझी मैत्री ही जुनी आहे. कोल्हे यांनी प्रसंगी घरदार विकून छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे यांचा इतिहास मांडला. मला अभिमान आहे की मी या सच्चा मावळ्यासाठी तुमचे आशीर्वाद मागतोय, असे मुंडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची या मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी सभा झाली. त्याला जेमतेम गर्दी झाली होती. तीही २०० रुपये देऊन आणलेली. यावरून हवेचा रोख ओळखा, असे मुंडे म्हणाले. डॉ. अमोल कोल्हे हा छत्रपतींचा मावळा आहे. या मावळ्याच्या गर्जनेने विरोधकांची पळता भुई थोडी झाली आहे. दिल्ली हदरवून सोडण्यासाठी या मावळ्याला लोकसभेत प्रचंड बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अशोकबापू पवार, दिलीपराव ढमढेरे उपस्थित होते.