सरकारच्या डोक्यात सत्तेची मस्ती घुसली आहे. ती उतरवण्याचे काम या निवडणुकीत करायचे आहे. बारामतीच काय महाराष्ट्रात इतर मतदारसंघात भाजपला बाप जन्मात यश मिळू देणार नाही तसेच त्यांच्या डोक्यात घुसलेली सत्तेची मस्ती दूर करणारच असे आव्हान शरद पवार यांनी भाजपला दिले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील प्रचार सभेत पवार बोलत होते.

या सभेस शिवाजीराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील,आनंदराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर,प्रभाकर घार्गे, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, सुनील माने,सत्यजितसिंह पाटणकर, दलित पँथरचे सुखदेव सोनवणे आदी प्रमुख उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रास्ताविक केले. सर्वांनी सातारचा स्वाभिमान उदयनराजे यांना मोठ्या मतांनी निवडून द्यावे असे सांगितले.

मोदी सरकारवर जोरदार टीका करत शरद पवार म्हणाले, सातारा म्हणजे कर्तुत्ववान नररत्नांची खान, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवरायांचा हा जिल्हा आहे. ब्रिटीशांना धडा शिकवणा-या क्रांतीकारकांची पत्री सरकारची ही भुमी आहे. भारत हा शेतक-यांचा देश आहे. मात्र सरकारने शेतक-यांसाठी काहीच पोषक आणि पुरक काम केले नाही. आमच्या सत्तेच्या काळात अधिक हमीभाव दिला. आणि १२०कोटी जनतेला अन्न देणा-या बळिराजाला सन्मानाने जगण्यासाठी सर्वात मोठी कर्जमाफी दिली.यांनी नोट बंदी जीएसटी ने देशातील जनतेला वेठीला धरले.जाती पातीत भांडणे लावली,समाजा समाजात दुरावा निर्माण केला.

शेतकरी,व्यापारी,मध्यमवर्ग उद्योजक पाच वर्षे भीती ,दडपणाखाली जगला .कधी नव्हे एव्हडे देशात अस्वस्थ वातावरण राहीले. देशातील अनेक क्षेत्रात मंदीचे वातावरण राहिले . या पाच वर्षात त्यांनी कोणालाही सोडले नाही . सैनिकांच्या कर्तबगारीचा प्रचारात गैरवापर केला .

पाकिस्तामध्ये अपघाताने गेलेले वैमानिक अभिनंदन भारतात सुखरुप परतले तेव्हा आमचे ५६ इंच छातीवाले पंतप्रधान त्याचे श्रेय घेतात. मग गेली साडेतीन वर्षे पाकिस्तानच्या तुरूंगात खितपत पडलेले कुलभूषण जाधव यांना का सोडवू शकत नाहीत.मागील पाच वर्षात खोटे बोल पण रेटून बोल. नुसत्या मोठ्या बाता मारणा-या लोकांकडून देशाचे संरक्षण होणे शक्य नाही. म्हणुन परिवर्तन घडवा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोकळ्या अंतकरणाचा व रोखठोक स्वभावाचा उदयनराजे भोसलेंसारखा वंशरखा उमेदवार दिल्लीत पाठवा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. शहिद हेमंत करकरे यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करताना यांना लाज कशी वाटत नाही. हुतात्म्यांबद्दल आस्था नसणा-य‍ांना जनतेचाच शाप भोगावा लागेल, असा इशाराही तयांनी दिला.