चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

गोकुळ दूध संघातील सत्ताकारणासाठी खासदार धनंजय महाडिक यांना  राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास महादेवराव महाडिक यांनी भाग पाडले आहे. या नियोजनामागे शरद पवार, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हेही सहभागी आहेत, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केला.

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आज पाटील यांनी शहरात प्रचाराचा धडाका लावला. येथील एका प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी गोकुळच्या मलईदार अर्थकारणावर प्रथमच धिटाईने बोट ठेवले. प्रचार अंतिम टप्य्यात आला असताना मंत्री पाटील यांनी गोकुळच्या राजकारणासाठी महाडिक कुटुंबाची राजकीय कोंडी कशी झाली आहे यावर प्रकाशझोत टाकला.

गोकुळ हा महाडिक यांचा ‘प्राण’ आहे. गोकुळचे गणित बिघडू नये म्हणून धनंजय महाडिक यांना शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याऐवजी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची सक्ती करण्यात आली. हा माझा बॉम्बस्फोट आहे, असा उल्लेख मंत्री पाटील म्हणाले, कारण महाडिक शिवसेनेच्या चिन्हावर लढले असते तर सगळे सहजसोपे आणि एकमार्गी झाले असते. घरही विचलित झाले नसते. आता अमल  महाडिक, शौमिका महाडिक, धनंजय महाडिक यांना अडचणी आल्या आहेत. शरद पवार, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी चाल रचून आत येण्याचे आमिष दाखवून धनंजय महाडिक यांना बरोबर पिंजऱ्यात अडकवले आहे. त्यांची जाणीव असूनही खासदार महाडिक काहीच करू शकत नाही कारण गोकुळवर राज्य महादेवराव महाडिक यांचे आहे. बहुराज्य दर्जा नाही – पाटील

गोकुळ दूध संघाला बहुराज्य दर्जा मिळवण्याचा प्रयत्न महादेवराव महाडिक यांचा आहे. मात्र यावरून मंत्री पाटील यांनी आR मक भूमिका घेतली. ते म्हणाले, धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे चिन्ह घेतले असते तर गोकुळ मध्ये उभी फूट पडेल हे महादेवराव महाडिक यांना माहीत होते. गोकुळच्या हितापुढे महादेवरावांना लोकसभा, देश, सुरक्षा अशा विषयांचे काहीच देणेघेणे नाही. त्यांना केवळ गोकुळ, त्यातील टँकर यातच हित वाटते. शिवाय, शिवसेनेचे चिन्हाचा मुद्दा आल्यावर काँग्रेसचे पी. एन. पाटील यांनी गोकुळ मधून बाहेर पडतो असा पवित्रा घेतला असता. मुख्य म्हणजे गोकुळला बहुराज्य दर्जा हवा असला तरी त्यासाठी राज्य शासनाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ लागते. काही झाले तरी राज्य शासन गोकुळला बहुराज्य दर्जा मिळवू देणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी या वेळी केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.