पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून निवड झाल्यानंतर मोदी हे संसदीय सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. भारताच्या लोकशाहीला आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतातील मतदारांना तुम्ही कोणत्याही मापदंडात मोजू शकत नाही. सत्तेच्या मानसिकतेचा मतदार स्वीकार करत नाही, असे मोदींनी म्हटले आहे.

संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यापूर्वी मोदींनी संविधानाला नमन केले. भाषणातही मोदींनी याचा उल्लेख केला. मी संविधानाला नमन केले. लोकप्रतिनिधींमध्ये कधीही भेदभाव करता येणार नाही. जे आपल्यासोबत आहेत किंवा भविष्यात आपल्यासोबत येतील, आपण त्यांच्यासाठी काम करतोय, असे त्यांनी नमूद केले.

साधारणत: निवडणुकीत विभाजन होते. लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो, भिंत उभी राहते, पण २०१९ मधील निवडणुकीने जनतेमधील भिंत तोडली आहे. या निवडणुकीने मन जोडण्याचे काम केले, असा दावाही मोदींनी केला. हा देश मेहनतीची पूजा करतो. देश प्रामाणिकपणाचा आदर करतो आणि हीच या देशाची पवित्रता आहे, असेही मोदींनी म्हटले आहे. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपाला जास्त मते मिळाली असून यात तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

भारताच्या लोकशाहीत आणि निवडणुकीच्या परंपरेत जनतेने एका नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. आपण सर्व जण त्याचे साक्षीदार आहोत. २०१४ ते २०१९ या कालावधीत देश आपल्यासोबत चालत होता. कधी कधी देश आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे होता. या कालावधीत देशातील जनतेने आपल्यासोबत भागीदारी करत देशाला पुढे नेले, असे मोदींनी म्हटले आहे.