देशाच्या विकासाठी निधीची कमतरता नाही. चांगले काम करणारयांची कमी आहे. चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्टाचार आणि विकासाचा दृष्टिकोन नसलेले देशाचे नेतृत्व यामुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. पाच वर्षांत देशात १७ लाख कोटी रुपयांची विकासकामे झाली. यात महाराष्ट्रातील ६ लाख कोटी रुपयांच्या कामांचा समावेश होता. देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अलिबाग येथे केले.

या वेळेसची लोकसभा निवडणूक देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. देशातील आतंकवाद, नक्षलवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी भक्कम कणखर नेतृत्व आणि स्थिर सरकारची आवश्यकता आहे. ते कोण देऊ शकते याचा विचार करा आणि मगच मतदान करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले

देशात पन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता होती. परंतु त्यांनी चुकीची आर्थिक धोरणे राबवली. भ्रष्टाचार केला. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन नव्हता त्यामुळे देशाचा गतिमान विकास होऊ शकला नाही. देश श्रीमंत झाला परंतु देशातील जनता गरीब राहिली, आशी टीका गडकरी यांनी केली. विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा नाही. केवळ मोदी हाटाव हाच त्यांचा नारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी अनेक पक्ष एकत्र आले आहेत. ही संधिसाधूंची आघाडी आहे. यांचे कडबोळ्याचे सरकार आले तर देशाचा विकास होणार नाही.

या वेळी गेल्या पाच वर्षांत दळणवळण मंत्रालयामार्फत देशभरात झालेल्या कामांचा आढावा त्यांनी मांडला. मुंबई-दिल्ली शहरांना जोडणारा दृतगती मार्ग. गौतम बुद्धाच्या कर्मभूमीतील विविध स्थळांना जोडणारा बुद्धा सर्किट महामार्ग. केदारनाथ-बद्रिनाथ या तीर्थस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाच्या कामांचा त्यांनी या वेळी दाखला दिला. मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीचा अहवालही त्यांनी या वेळी मांडला. मांडवा-मुंबई रो रो सेवेचे प्रकरण न्यायालयात गेले नसते तर ती सेवा आज सुरू झाली असती. अलिबाग-पेण मार्गाच्या चौपदरीकरण भूंसंपादनातील अडचणीमुळे होऊ शकले नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

ज्यांनी रायगडातील तीन बँका बुडविल्या ते सर्व नेते आज या निवडणुकीत एकत्र आले आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचाही गैरवापर केला जात आहे. निवडणुकीची सुत्रे हलवली जात आहेत, पण आता मी गप्प बसणार नाही.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागे चौकशीची साडेसाती लावून त्यांची झोप उडवीन, असे म्हणत अनंत गीते यांनी शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई हेदेखील उपस्थित होते. मोदींना हरवायचे आहे. पण निवडणूक लढवायला कोणी तयार नाही. आणि जे निवडणूक लढवत नाही ते इतरांसाठी मते मागत फिरत असल्याचे ते म्हणाले. देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.