वाराणसी : समृद्ध भारतासाठी विकासाइतकीच देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, नवा भारत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ते वाराणसीत बोलत होते.

मोदी यांनी गुरुवारी वाराणसीत भव्य ‘रोड शो’द्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोदी यांनी सुमारे सात किलोमीटपर्यंतच्या ‘रोड शो’ची सुरुवात केली. गंगा आरतीनंतर त्यांनी एका सभेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले.

‘‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. आता जगातील बहुतांश देश दहशतवादाविरोधातील लढय़ात भारताला साथ देत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेला आमचे प्राधान्य असून, आमच्या सरकारने दहशतवादाबाबत कठोर भूमिका घेतली आहे,’’ असे मोदी म्हणाले.

‘‘काशीने मला खासदार म्हणूनच नव्हे, तर पंतप्रधान म्हणून आशीर्वाद दिला आहे. तेथील विकासाचे आध्यात्मिक, व्यावहारिक आणि मानवी असे तीन मुख्य पैलू आहेत,’’ असे मोदी म्हणाले. सर्व कामे झाल्याचा दावा नाही. मात्र, विकासाची दिशा योग्य आहे. पाच वर्षांत सरकारने प्रामाणिकपणे काम केले. पुढील पाच वर्षांत त्याची फलनिष्पत्ती दिसून येईल, असे मोदी यांनी सांगितले.