नवी दिल्ली : भाजपला २३० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हा चांगला ‘पर्याय’ ठरू शकतो, असे वक्तव्य भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका मुलाखतीत केले.

भाजपला २२० किंवा २३० आणि ‘एनडीए’च्या घटक पक्षांना ३० अशा २५० जागा आम्हाला हमखास मिळतील. परंतु आणखी ३० जागांची आवश्यकता भासेल, असेही स्वामी म्हणाले. मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का, या प्रश्नावर ते म्हणाले, ते ३०-४० जागा जिंकलेल्या घटक पक्षांवर अवलंबून असेल. त्यांनी मोदींना नकार दिला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नाही.

पंतप्रधानपदासाठी मोदी यांना गडकरी हा चांगला पर्याय ठरू शकतो का, याविषयी स्वामी म्हणाले, ‘ते (गडकरी) मोदी यांच्याएवढेच चांगले आहेत.’ नेतृत्वात बदल केला तर ‘बसप’च्या मायावती ‘एनडीए’त आल्यासआश्चर्य वाटणार नाही, असे स्वामी म्हणाले.