महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता आणि राहील असं बेताल वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदासंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी टीका केली आहे. गांधीजींबाबत अशाप्रकारची विधान कधीच स्वीकारली जाणार नाहीत, असं नितीश म्हणालेत.

साध्वीचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा भाजप अंतर्गत प्रश्न आहे, पण साध्वीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा भाजपाने विचार करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला. याशिवाय आपण अशा तऱ्हेची वक्तव्ये सहन करू शकत नाही, असा सूचक इशाराही नितीश कुमार यांनी भाजपाला दिला आहे. अशाप्रकारच्या विधानांसाठी त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा विचार व्हायला हवा असं नितीश म्हणाले. पाटणामध्ये मतदानानंतर पत्रकारांशी नितीश बोलत होते. इतक्या दीर्घकाळ निवडणुका होऊ नयेत असंही लोकसभेच्या प्रदीर्घ निवडणुकांबाबत बोलताना नितीश म्हणाले.


काय आहे प्रकरण – 

नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाली, असं मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना साध्वी प्रज्ञा सिंहने ‘नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल’, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर भाजपाने त्यांना माफी मागण्यास सांगितलं. त्यानुसार, “मी रोड शोमध्ये होते. भगव्या दहशतवादाशी संबंधित प्रश्न मला विचारण्यात आला. मी चालता चालता तातडीने उत्तर दिलं. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, मी माफी मागतो. गांधीजींनी देशासाठी जे काही केलं आहे, ते विसरता येण्यासारखं नाही. मी त्यांचा अतिशय आदर करते. मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी पक्षाची शिस्त पाळणारी कार्यकर्ता आहे. जे पक्षाचे विचार आहेत, तेच माझे विचार आहेत.” असं म्हणत त्यांनी माफी मागितली.