भारतीय सैन्याने केलेल्या लष्करी कारवायांचा राजकीय वापर होत असल्याने काही माजी सैनिक भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे धाव घेतली असून त्यांना एक पत्रही लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे.

हे पत्र लिहिणाऱ्या १५६ माजी सैनिकांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासह देशाच्या तिन्ही दलांच्या ८ माजी प्रमुखांच्या सह्या आहे. सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजपाने सैन्याच्या कामगिरीवरुन मत मागण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. हेच या अधिकाऱ्यांना खटकले आहे, त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे.

बालाकोट हल्ल्यावेळी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होऊन देशात परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे छायाचित्र काही जणांनी फ्लेक्सवर लावले होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सैन्याचा उल्लेख मोदींची सेना असा केला होता.

त्याचबरोबर, लातूर जिल्ह्यातील औसा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन करताना पुलवामातील शहीदांची, पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांची आठवण ठेवताना, त्यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. इतकेच नव्हे त्यांच्यासाठी मत देताना ते कमळाच्या बटण दाबून द्यावे म्हणजे तुमचे मत मोदींना जाईन असे उघडपणे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रारही देण्यात आली आहे.

मोदींच्या या वक्तव्यावर यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे माजी लष्करी अधिकाऱ्यांना थेट राष्ट्रपतींकडेच धावा घ्यावी लागली असे सांगण्यात आले.