प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कार्यकर्त्यांशी संवाद

ठाणे : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नसतानाही राज्यभर भाजप सरकारविरोधात जाहीर सभा घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार नाही हे आता स्पष्ट होत आहे. या सभेऐवजी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी २७ एप्रिल रोजी राज संपूर्ण दिवसभर ठाण्यात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

दरम्यान, ठाण्यातील मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार सुरू केला असून राज आपल्या ठाणे दौऱ्यात कार्यकर्त्यांना सूचक संदेश देतील, अशी चिन्हे आहेत. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसे सामील होणार असल्याची चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीसंदर्भात कोणत्याही नेत्यासोबत चर्चा झाली नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. त्यानंतर मनसे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता होती. मात्र, राज यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उभा नाही. असे असले तरी राज ठाकरे हे भाजप सरकारविरोधात जाहीर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करीत आहेत. या सभांमध्ये ते ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून भाजप सरकारच्या दाव्यांतील फोलपणा उघड करीत आहेत. त्यामुळे राज यांच्या सभा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ठाण्यातही राज यांची जाहीर सभा होणार असल्याची चर्चा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. २३ वा २४ एप्रिल रोजी राज यांची ठाण्यात सभा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी योग्य जागेचा शोधही सुरू केला होता. मात्र, मुंबई, ठाण्यातील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना त्यांची सभा घेणार नाही.

ठाण्यात ठाण मांडणार

या संदर्भात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. २६ एप्रिलला नाशिक येथील सभा आटोपून ते ठाण्यात येणार आहेत. येथे त्यांची जाहीर सभा होणार नसली तरी ते ठाण्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाण मांडून बसणार आहेत. या दरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.