22 September 2020

News Flash

मीरा-भाईंदरमध्ये सेनेची मदार उत्तर भारतीय, जैन मतदारांवर

 उत्तर भारतीयांप्रमाणेच शहरातील जैन, गुजराती आणि राजस्थानी समाजातील मतदारांची मते मतदानावर प्रभाव टाकणारी आहेत. २

(संग्रहित छायाचित्र)

मीरा भाईंदर शहरात जैन, गुजराती आणि राजस्थानी मतदारांसोबतच उत्तर भारतीयांची संख्यादेखील लक्षणीय असल्याने शिवसेनेने आपले सर्व लक्ष या मतांवरच केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्यातील एकही महत्त्वाचा नेता मीरा भाईंदरमध्ये फिरकला नसला तरी केंद्रातील दोन मातब्बर उत्तर भारतीय मंत्री शहरात पाचारण करण्यात आले.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत राज्यातील एकही महत्त्वाचा नेता मीरा भाईंदरमध्ये आलेला नाही. युतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो यशस्वी झाला नाही. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचादेखील रोड शो करण्याचा प्रयत्न होता, परंतु शनिवारी सायंकाळी प्रचार समाप्त होत असल्याने आता महत्त्वाचे नेते प्रचारासाठी मीरा भाईंदरमध्ये येतील अशी शक्यता नाही. मात्र शहरातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेऊन शिवसेनेने उत्तर भारतातील दोन बलशाली नेते मात्र प्रचारासाठी आणण्यात यश मिळवले.

काही दिवसांपूर्वीच भाईंदर पश्चिम येथे उत्तर भारतीय मेळावा घेण्यात आला. त्याला उत्तर प्रदेशमधील मातब्बर नेते आणि केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना बोलाविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीदेखील जाहीर सभा अचानकपणे मीरा रोड येथे लावण्यात आली. जास्तीत जास्त उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा शिवसेनेने प्रयत्न केल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. त्याआधी होळी समारंभ तसेच राम जन्ममहोत्वाचे आयोजन करून शिवसेनेने उत्तर भारतीयांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

उत्तर भारतीयांप्रमाणेच शहरातील जैन, गुजराती आणि राजस्थानी समाजातील मतदारांची मते मतदानावर प्रभाव टाकणारी आहेत. २०१४ मध्ये लोकसभा, त्यानंतर झालेली विधानसभा आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा मतदार भाजपकडे झुकला होता. महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. जैन समाजातील मते मिळविण्यासाठी शिवसेनेने त्या वेळी पूर्ण ताकद लावली होती. मात्र त्यात ते अपयशी ठरले होते.

त्यामुळे या वेळी ही मते शिवसेनेला मिळावीत यासाठी सेना नेत्यांना मोठीच कसरत करावी लागत आहे. प्रत्येक मेळाव्यात तसेच जाहीर सभांमधून राजन विचारे यांना मत म्हणजे भाजपला आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांना मत हे मतदारांवर ठसविण्याचा जोरदार प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. शिवाय हे मतदार बहुसंख्य असलेल्या परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊनच प्रचार करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.

प्रचारासापासून मनसे अलिप्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केला असला तरी मनसेचे पदाधिकारी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत नाहित. गेल्या आठवडय़ात मीरा रोड येथे झालेल्या शरद पवार आणि अशोक चव्हाण  यांच्या जाहीर सभेच्या निमंत्रकांमध्ये म्हणून पदाधिकाऱ्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. परंतु या सभेला मनसेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. राज्यात कुठेही काँग्रेस आघाडीच्या प्रचारात मनसे सहभागी नाही. त्यामुळे मीरा भाईंदरमध्येही मनसे काँग्रेस आघाडीच्या प्रचारात नाही, परंतु शहरात जागोजागी मोदी सरकारच्या कारभाराविरोधात चौकसभा घेण्यात येत आहेत तसेच शनिवारी एका रॅलीचे स्वतंत्रपणे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे शहरप्रमुख प्रसाद सुर्वे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:17 am

Web Title: northern indians jains voters in mira bhayander
Next Stories
1 दोन खासदार असूनही वाडा सुविधांपासून वंचित
2 मुंबईतल्या सभेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी मध्यमवर्गाबद्दल
3 मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा – पंतप्रधान मोदी
Just Now!
X