गोव्यात दक्षिण व उत्तर असे लोकसभेचे दोन मतदारसंघ येतात. गेल्या वेळी दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता. यंदाची परिस्थिती वेगळी आहे. गोव्यात भाजप उभारणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या पश्चात पक्ष निवडणुकीला सामोरा जात आहे. त्यामुळे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची कसोटी आहे. उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाच पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना रिंगणात उतरवले आहे. या दोघांचीही प्रतिमा चांगली आहे. दोघेही भंडारी समाजाचे आहेत; पण चोडणकर हे दक्षिण गोव्यातील आहेत. या मतदारसंघात काँग्रेसच्या तुलनेत भाजपची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. श्रीपाद नाईक १९९९ पासून या मतदारसंघात विजयी होत आहेत. गेल्या वेळी त्यांनी काँग्रेसच्या रवी नाईक यांचा लाखाहून अधिक फरकाने पराभव केला होता. स्थानिकांमध्ये भाऊ नावाने ओळखले जाणाऱ्या श्रीपाद नाईक यांचा मतदारसंघात व्यक्तिगत संपर्क आहे. अर्थात दोन दशके लोकप्रतिनिधी राहून मतदारसंघात मोठी विकासकामे त्यांनी केली आहेत असा प्रकार नाही. त्यामुळे काही प्रमाणात मतदारांमध्ये नाराजी आहे.