मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नोटाबंदीच्या मुद्यावरुन सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींना झटका आला. एकारात्रीत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. एका माणसाला आलेला झटका देशाचं धोरण कसं काय असू शकतं अशी टीका राज ठाकरेंनी प्रत्येक सभेतून केली आहे. त्यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज उत्तर दिले.

नोटाबंदी हा घोटाळा नाही. नोटाबंदी एकारात्रीत झटक्यातून आलेला निर्णय नाही. नोटबंदीचा निर्णय घेण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळापैसा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले होते. २ लाखांच्या व्यवहारावर पॅनकार्ड बंधनकारक केलं होतं. मोदींनी संसदेत प्रवेश केला तेव्हाच काळया पैशावर प्रहार करणार हे सांगितलं होतं. आम्ही नोटाबंदीच्या परिणामांवर चर्चा करायला तयार आहोत पण हा घोटाळा नाही असे आशिष शेलार यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी त्यांनी नोटाबंदीनंतर झालेल्या बदलांची आकडेवारी सादर केली. नोटाबंदीनंतर ३ लाख ३४ हजार बनावट कंपन्या बंद झाल्या. याला घोटाळा म्हणाल का? नोटाबंदीपूर्वी करसंकलन ७ ते ९ टक्क्याने वाढतं होतं. नोटाबंदीनंतर हे करसंकलन १५ ते १८ टक्क्याने वाढलं. नोटबंदीपूर्वी इन्कम टॅक्स रिर्टन भरणारे ३ कोटी ८० लाख होते. नोटबंदीनंतर हाच आकडा ६ कोटी ८६ लाख झाला. हा घोटाळा कसा काय असू शकतो? असा सवाल शेलार यांनी राज ठाकरेंना विचारला.

नोटाबंदी फसली. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ९९ टक्के कॅश बँकेत परत आली या राज ठाकरेंच्या आरोपाला जे पैसे बँकेत कॅशच्या रुपाने आले. त्याचे नाव, अॅड्रेस, माहिती समोर आली. पैसे आल्यामुळे बँकाही सक्षम झाल्या असा दावा त्यांनी केला. नोटाबंदीच्या विषयावर राज ठाकरे कुठल्याही फोरमवर या आम्ही चर्चेला तयार आहोत असे आव्हान त्यांनी दिले.