नगर मतदारसंघ निवडणूक; प्रशिक्षणातील अनुपस्थिती भोवली

सार्वत्रिक निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा करुन केंद्रीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल, निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्य़ाच्या नगर लोकसभा मतदारसंघातील ३८१ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणाऱ्या नोटिसा सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी धाडल्या आहेत. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये गुन्हा का दाखल करु नये, याचा खुलासा नोटीस मिळताच एक दिवसांत करावा, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. निवडणूक विभागाकडून ही माहिती देण्यात आली. या नोटिसांमुळे निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

जिल्ह्य़ात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. नगर मतदारसंघाची निवडणूक २३ एप्रिल, तर शिर्डी मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिलला होत आहे. दोन्ही निवडणुकांसाठी दहा टक्के अधिक गृहीत धरुन सुमारे २१ हजार कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नगर मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या १० हजार ५८२ कर्मचाऱ्यांना गेल्या रविवारी (दि. ७) लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय पहिले प्रशिक्षण देण्यात आले. दुसरे प्रशिक्षण शनिवारी (दि. १३) तालुका पातळीवरच होणार आहे.

पहिल्या प्रशिक्षणासाठी शेवगावमध्ये १९०८, राहुरीत १५०२, पारनेरमध्ये १७१४, नगरमध्ये १९४५, श्रीगोंद्यात १६४०, कर्जत-जामखेड मध्ये १८७३ कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यातील ३८१ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला वेगवेगळी कारणे देत दांडी मारली. याची दखल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली व प्रत्येक सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्याचा अहवाल मागवला. त्यानुसार सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनाच अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नगर मतदारसंघाबरोबरच शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही उमेदवारांच्या अधिक संख्येमुळे प्रत्येक मतदान केंद्रावर एका अतिरिक्त मतदान यंत्राची गरज भासणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना अधिक काळजीपूर्वक काम करावे लागणार आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यायची याची माहिती प्रशिक्षणात दिली जाते. अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणाला हजर असले तरी आपल्याला अनेक निवडणुकांचा अनुभव आहे, असा बहाणा करत अनेक जणांचा टाईमपास करण्याकडेच कल असल्याचे निदर्शनास येत असल्याचा प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. नगर मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी ८ हजार ९४४ कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण दि. १३ रोजी होणार आहे. दरम्यान शिर्डी मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण उद्या, गुरुवारी आयोजित करण्यात आले आहे.