ओदिशातील पुरी मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संबित पात्रा अखेर पराभूत झाले आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार पिनकी मिश्र यांनी पात्रा यांचा ११, ७१४ मतांनी पराभव केला आहे. पुरी या मतदारसंघाला धार्मिक महत्त्व असून १९९८ पासून या मतदारसंघावर बिजू जनता दलाचे वर्चस्व आहे.

पुरी या मतदारसंघात दोन पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये लढाई होती. या मतदारसंघात नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचे विद्यमान खासदार व प्रवक्ते पिनकी मिश्र आणि भाजपातर्फे संबित पात्रा हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मिश्रा हे २००९ पासून पुरीतून निवडून येत आहे. संबित पात्रा मुळचे ओदिशाचे असून उत्तर प्रदेशमधील नुकसान भरुन काढण्यासाठी भाजपाने ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. संबित पात्रा हे भाजपाचे प्रवक्ते म्हणून देशभरात परिचित आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या मतदारसंघातील निकाल अखेर जाहीर झाले असून यात पिनकी मिश्र यांना पाच लाख ३८ हजार ६२१ मते मिळाली. तर पात्रा यांना ५ लाख २६ हजार ६०७ मते मिळाली. काँग्रेसचे सत्यनारायण नायक यांना फक्त ४४, ५९९ मते मिळाली. तर बहुजन समाज पक्षाच्या नृसिंह चरण दास यांना ६, २५९ मते मिळाली. ओदिशात लोकसभेच्या एकूण २१ जागा असून यातील १२ जागांवर बिजू जनता दल तर ८ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.